दिग्विजय सिंहांच्या प्रचारात ‘जय श्रीराम’चा जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:07 AM2019-05-09T05:07:54+5:302019-05-09T05:08:17+5:30
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या बुधवारच्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने साधू -संत सामील झाले होते.
भोपाळ : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या बुधवारच्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने साधू -संत सामील झाले होते. त्यांच्यापैकी काही जणांनी जय श्रीराम असा जयघोष सुरु केला. त्यामुळे मतदारही गोंधळून गेले.
भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या समर्थनार्थ रा.स्व.संघाने आघाडी सांभाळली आहे, तर दिग्विजय सिंह यांचा विजय व्हावा म्हणून कम्प्युटर बाबा मैदानात उतरले आहेत. वैशाख वणव्यातही त्यांनी साधू संतांच्या मदतीने प्रचार सुरु केला आहे. साधू-संतांनी येथे नुकताच हठयोग केला. कम्प्युटर बाबा यांनी स्वत: दिग्विजय सिंह यांच्या यशासाठी हवन केले.
प्रचार फेरीमध्ये साधू-संतांनी कॉँग्रेसचा झेंडा हाती धरला होता. काही जण राहुल गांधी यांचा जयघोष करत होते. भवानी चौक ते लाल परेड मैदान दरम्यान ही प्रचार फेरी निघाली. विसंगत घोषणांमुळे गंमतीशीर दृश्य निर्माण झाले. या यात्रेचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
दोन्हीकडून हवन, मंदिर दर्शन
भोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान होत असून प्रचारासाठी काही दिवस शिल्लक आहेत. दोन्ही उमेदवार प्रचारासाठी वेगळी तंत्रे अवलंबित आहेत. साधू-संताचा आश्रय घेणे किंवा मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणे हाही त्याचाच एक भाग आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही हवन व मंदिर दर्शन सुरू केले आहे. (वृत्तसंस्था)