ज्या स्टेडिअममध्ये कपिल देव यांनी ट्रेनिंग घेतली त्याठिकाणी उभं राहणार कारागृह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 01:09 PM2017-08-23T13:09:23+5:302017-08-23T13:12:42+5:30
सेक्टर 16 मध्ये असणा-या याच क्रिकेट स्टेडिअममध्ये कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटचे धडे घेतले आहेत
चंदिगड, दि. 23 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख संत गुरमीत राम रहिम सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोप प्रकरणी शुक्रवारी न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. यावेळी गुरमीत राम रहिम सिंह यांचे समर्थक शहरातील कायदा - आणि सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणा-या समर्थकांना ताब्यात ठेवण्यासाठी पोलीस क्रिकेट मैदानात तात्पुरतं कारागृह उभारणार आहेत. सेक्टर 16 मध्ये असणा-या याच क्रिकेट स्टेडिअममध्ये कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटचे धडे घेतले आहेत. भारताला स्टार खेळाडू देणारं हे स्टेडिअम शुक्रवारी मात्र कारागृह म्हणून आरोपी उभे करताना दिसेल.
1995 रोजी मोहालीत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम उभं राहिल्यानंतर या स्टेडिअमचं महत्व कमी झालं. या स्टेडिअममध्ये जानेवारी 1985 रोजी पहिला एकदिवसीय सामना आयोजित करण्यात आला होता. 1990 मध्ये एकमेव कसोटी सामना येथे झाला होता. 1985 ते 2007 दरम्यान फक्त पाच एकदिवसीय सामने येथे खेळवले गेले.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख संत गुरमीत राम रहिम सिंह यांच्यावर एका साध्वीने बलात्काराचा आरोप केला आहे. पंचकुला सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्यांच्यावर हे आरोप लावण्यात आले आहेत. यापूर्वीही एका साध्वीने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एस नारंग यांच्या समक्ष दुस-या एका साध्वीनेही सिंह यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे म्हटले होते.
गुरमीत राम रहिम सिंह यांच्या समर्थकांना शहरात प्रवेश मिळू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र जे समर्थक आधीच चंदिगडमध्ये आले आहेत त्यांना ताब्यात घेऊन या स्टेडिअममध्ये ठेवण्यात येणार आहे. एकूण 15.32 एकर जमिनीवर स्टेडिअम उभारण्यात आलं आहे. 20 हजार लोकांची स्टेडिअमची क्षमता आहे. गुत्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 10 लाख समर्थक निकालावेळी शहरात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
'शहरात हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित राहतील अशी माहिती आहे. इतक्या लोकांना आम्ही जेलमध्ये ठेवू शकत नाही, म्हणूनच स्टेडिअमचा पर्याय वापरत आहोत', अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. जोपर्यंत शहरातील परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत सर्वांना स्टेडिअममध्ये बंदिस्त करुन ठेवण्यात येणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत
पोलिसांनी आधीच शहरात 144 कलम लागू केलं असून गरज पडल्यास शाळा आणि सरकारी इमारतींनाही कारागृह म्हणून वापरण्यात येणार आहे. आम्ही सर्व परिस्थितींचा सामना करण्यास तयार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शहरात एकूण 3500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. पंजाब आणि हरियाणाला जोडणा-या सर्व सीमारेषा सील करण्यात येणार आहेत. याशिवाय निमलष्करी दलाच्या सात तुकड्या पाठवण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.