भारतात साक्षरतेत जैन समुदाय सर्वात पुढे
By Admin | Published: June 3, 2017 01:24 AM2017-06-03T01:24:49+5:302017-06-03T01:24:49+5:30
जगातील विविध धार्मिक समुदायांत यहुदींमध्ये शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर भारतात हा सन्मान जैन समुदायाकडे
शीलेश शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील विविध धार्मिक समुदायांत यहुदींमध्ये शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर भारतात हा सन्मान जैन समुदायाकडे जातो. सरकारी आकडेवारीनुसार, जैन समुदायात ८६ टक्के लोक शिक्षित आहेत. तथापि, बिगर सरकारी आकडेवारीनुसार, या समुदायातील ९४.१ टक्के नागरिक शिक्षित आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. एकूण शिक्षित लोकांत ९७.४ टक्के पुरुष आणि ९०.६ टक्के महिला शिक्षित आहेत.
मुस्लिम समुदायाचा अशिक्षित म्हणून उल्लेख केला जातो. कारण, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ४३ टक्के मुस्लिम अशिक्षित आहेत. सात वर्षांच्या वरील मुलांमध्ये जैन समुदायाचे असे १३.५७ टक्केच मुले आहेत जे अशिक्षित आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार सरकारी दस्तऐवजांमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. मुस्लिम समुदायातील सात वर्षांच्या वरील ४२.७२ टक्के मुले अशिक्षित आहेत. याचा अर्थ असा आहे की, मुस्लिम मुलांना सुरुवातीपासूनच शिक्षणात रस असत नाही. हिंदू मुलांमध्ये अशिक्षितांचे प्रमाण ३६.४ टक्के आहे. शीख समुदायात अशिक्षित मुलांचे प्रमाण ३२.४९ टक्के आहे. बौद्ध समुदायात हे प्रमाण २८.१७ टक्के आणि ख्रिश्चन समुदायातील २५.६६ टक्के मुले अशिक्षित आहेत.
२००१ ते २०११ या काळात शिक्षणाबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे दहा वर्षांत प्रत्येक समुदायात शिक्षित लोकांची संख्या वाढली आहे. हिंदूंमध्ये साक्षरता ८ टक्क्यांनी, तर मुस्लिमात ९ टक्क्यांनी वाढली आहे.
जागरूकता वाढली
जगातील विविध समुदायांची आकडेवारी पाहिली, तर यहुदी शिक्षणात सर्वात पुढे आहेत; पण यात बहुतांश ते यहुदी आहेत जे इस्रायल आणि अमेरिकेत राहतात. अमेरिकेतील एका अहवालानुसार, ज्या हिंदूंची मुले १९७६ ते १९८५ या काळात जन्मलेली आहेत ती सरासरी ७ वर्षे शाळेत गेलेली आहेत, तर जी मुले १९३६ ते १९५५ या काळात जन्मलेली आहेत ती यांच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी काळ शाळेत टिकली आहेत.
आज मुलांचा बहुतांश वेळ शाळेतच जातो. हिंदूंच्या तुलनेत मुस्लिम मुले अतिरिक्त तीन वर्षे शाळेत शिक्षण घेत आहेत. याचा अर्थ असा की, शिक्षणाच्या बाबतीत मुले आज अधिक जागरूक झाली आहेत.