जैन समाजाचा पद्म पुरस्कारांवर मोठा ठसा
By admin | Published: April 12, 2015 01:42 AM2015-04-12T01:42:07+5:302015-04-12T01:42:07+5:30
कोणाच्या चटकन लक्षात आले नसले तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या विविध ‘पद्म’ पुरस्कारांवर जैन समाजाने मोठा ठसा उमटवला आहे.
नवी दिल्ली : कोणाच्या चटकन लक्षात आले नसले तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या विविध ‘पद्म’ पुरस्कारांवर जैन समाजाने मोठा ठसा उमटवला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत अवघे ०.४ टक्के एवढे अल्प प्रमाण असलेल्या या समाजाने ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये मात्र त्याहून कितीतरी अधिक म्हणजे सात टक्क्यांचा वाटा पटकाविला आहे. यंदा ‘पद्म’ पुरस्कारांनी गौरविलेल्या एकूण १०४ मान्यवरांपैकी सातजण जैन समाजाचे आहेत.
यंदाच्या मानकऱ्यांमध्ये एक ‘पद्मविभूषण’ आणि सहा ‘पद्मश्री’ जैन समाजातून निवडले गेले आहेत, हे लक्षणीय आहे. शिवाय परोपकारी सेवा, पारंपरिक आणि प्रायोगिक कला व प्रशासन यासह ज्या विविध क्षेत्रांसाठी या मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे त्यावरून जैन समाजाचे कार्य किती विविधांगी आहे, हेही स्पष्ट होते.
जैन समाजातील ज्या महानुभावांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यांत डॉ. डी. वीरेंद्र हेग्गडे (पद्मविभूषण), राहुल जैन, रवींद्र जैन, संजय लीला भन्साळी, वीरेंद्र राज मेहता, तारक मेहता आणि मीठा लाल मेहता (सर्व पद्मश्री) यांचा समावेश आहे. यापैकी मिठा लाल मेहता यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.
डॉ. हेगडे हे थोर परोपकारी लोकसेवक व दानशूर असून ते धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख आहेत. त्यांच्या संस्थेतर्फे आयुर्वेद, निसर्गोपचार, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कायदा व व्यवस्थापनशास्त्र यांचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसह एकूण ४० विविध शिक्षणसंस्था चालविल्या जातात. याखेरीज ग्राणीण रोजगार, कौशल्य विकास, शाश्वत ऊर्जास्रोत, व्यवसमुक्ती व मंदिरांचा जीर्णोद्धार अशी कामेही डॉ. हेगडे यांच्या संस्थांतर्फे केली जातात. मिठा लाल मेहता व वीरेंद्र राज मेहता हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. संजय लीला भन्साळी व रवींद्र जैन हे अनुक्रमे लोकप्रिय चित्रपेच निर्माते व संगीत दिग्दर्शक आहेत. तारक मेहता हे गुजराती रंगभूमी व छोट्या पडद्यावरील प्रथितयश अभिनेते व दिग्दर्शक आहेत. राहुल जैन हे पारंपरिक वस्त्रविणकामतज्ज्ञ व आघाडीचे टेक्स्टाईल डिझायनर आहेत.
शिक्षण, प्रबोधनात आघाडी
जैन समाज शिक्षण व प्रबोधनात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जैन समाजातील साक्षरतेचे ९४.१ टक्के हे साक्षरतेचे प्रमाण ६४.८ टक्के या राष्ट्रीय सरासरीहून कितीतरी जास्त आहे. शिवाय पुरुष व महिलांच्या साक्षरतेमधील तफावत जैन समाजात सर्वात कमी आहे. देश पातळीवर हे प्रमाण सरासरी २१ टक्के आहे तर जैन समाजात ही तफावत जेमतेम ६.८ टक्के आहे. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई व थोर कवी, विचारवंत आणि तत्वचिंतक बनारसीदास हेही याच समाजाचे होते.