Jain Monk Tarun Sagar: जिलबी खाता-खाता 'ते' वाक्य ऐकलं अन् तरुण सागर बनले संत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 12:28 PM2018-09-01T12:28:41+5:302018-09-01T12:32:56+5:30
Jain Monk Tarun Sagar: सहावीत असताना तरुण सागर यांनी संत परंपरेचा स्वीकार केला होता आणि त्यामागची प्रेरणा ठरलं होतं, ते आचार्य पुष्पदन्तसागरजी महाराज यांचं एक वाक्य.
नवी दिल्लीः समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे जैन मुनी म्हणून सुपरिचित असलेले तरुण सागर यांचं आज पहाटे निधन झालं आहे. केवळ जैन धर्मियांनाच नव्हे, तर धर्माबद्दल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकालाच त्यांचं जाणं चटका लावणारं आहे. कारण त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी दिलेली शिकवण ही आजच्या काळात प्रत्येकासाठीच अनुकरणीय आहे. सहावीत असताना तरुण सागर यांनी संत परंपरेचा स्वीकार केला होता आणि त्यामागची प्रेरणा ठरलं होतं, ते आचार्य पुष्पदन्तसागरजी महाराज यांचं एक वाक्य. त्याची तरुण सागर यांनी सांगितलेली गोष्ट फारच रंजक आहे.
'शाळेत असताना मला जिलबी खूप आवडायची. एकदा शाळेतून घरी जात असताना एका हॉटेलमध्ये बसून मी जिलबी खात होतो. तेव्हा जवळच आचार्य पुष्पदन्तसागरजी महाराज यांचं प्रवचन सुरू होतं. आपणही ईश्वर होऊ शकतो, असं ते श्रोत्यांना सांगत होते. ते वाक्य मी ऐकलं आणि संत होण्याचा ध्यास घेतला', असं तरुण सागर यांनी सांगितलं होतं. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी, सर्व भौतिक सुखांचा त्याग करून पारमार्थिक जीवन जगण्याचा निर्णय तरुण सागर यांनी घेतला यातून त्यांची थोरवी सहज लक्षात येते. जे वाक्य ऐकून ते संत झाले, ते त्यांनी प्रत्यक्षातही आणून दाखवलं. असंख्य श्रद्धाळू अनुयायांचे ते देवच बनले होते.
Jain Muni Tarun Sagar passed away this morning in Delhi. He was 51 years old. pic.twitter.com/xLn14g569u
— ANI (@ANI) September 1, 2018
पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५१ वर्षांचे होते. अतिशय रोखठोक प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच, देशभरात प्रार्थना केली जात होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तरुण सागर यांच्यावर आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनुयायांची गर्दी लोटली आहे.
मध्य प्रदेशमधील दामोहमध्ये २६ जून १९६७ रोजी तरुण सागर यांचा जन्म झाला होता. त्यानंतर, ८ मार्च १९८१ रोजी त्यांनी संत परंपरेची दीक्षा घेतली होती.