Jain Monk Tarun Sagar: जैन मुनी आचार्य तरुणसागरजी महाराज सम्यक समाधीत लीन! देशभर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 05:38 AM2018-09-02T05:38:55+5:302018-09-02T05:41:28+5:30
आयुष्यभर विश्वशांतीचा संदेश देताना अनुयायांना ‘कडवे प्रवचन’ सुनावणारे जैन मुनी आचार्य तरुणसागरजी महाराज सम्यक समाधीत कायमचे लीन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
नवी दिल्ली : आयुष्यभर विश्वशांतीचा संदेश देताना अनुयायांना ‘कडवे प्रवचन’ सुनावणारे जैन मुनी आचार्य तरुणसागरजी महाराज सम्यक समाधीत कायमचे लीन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. संपूर्ण आयुष्य दु:खमुक्त मानवी जीवनासाठी समर्पित करणाऱ्या तरुणसागरजी यांच्या निधनामुळे जैन धर्मियांवरच नव्हे, तर समस्त देशात शोककळा पसरली आहे. तरुणसागरजींच्या पार्थिवावर दिल्ली मेरठ रस्त्यावरील तरुणसागर धाममध्ये अंत्यसंस्कार (समाधी शरण) करण्यात आले.
तरुणसागरजी यांच्या अंत्ययात्रेला अलोट जनसमुदाय लोटला होता. राधेपुरीहून सुरू झालेली त्यांची अंत्ययात्रा दिल्लीपासून २५ किलोमीटरवर असलेल्या तरुणसागरम तीर्थावर पोहोचताच, हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या अनुयायांच्या भावनेचा बांध फुटला.
राधेपुरीतील जैन मंदिरात तरुणसागरजींना समाधीवस्था प्राप्त झाली. पहाटेपासूनच मंदिरात लगबग सुरू झाली होती. अनुयायांच्या गर्दीचा अंदाज आल्याने पोलीस कर्मचारीही तैनात होते. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. लाकडी आसनावर मुनिश्री तरुणसागरजींचे पार्थिव आसनस्थ स्थितीत ठेवण्यात
आले होते.
सकाळी ९च्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. असंख्य अनुयायांनी पार्थिवास खांदा दिला. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला होता. हजारोंचा जनसमुदाय हा चिखल तुडवत राष्ट्रसंताच्या समाधीस्थ यात्रेत सहभागी झाला. रस्त्याच्या दुतर्फा लोक विनम्रपण हात जोडून दर्शन घेत होते. विविध संघटनांचे स्वयंसेवक सर्वांना शिस्त राखण्याचे आवाहन करीत होते. कुणालाही त्रास न होता, वाहतूक कोंडी न होता तरुणसागरजींचा अखेरचा प्रवास सुरू होता. हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर असल्याने वाहतूक काहीशी संथ होती.
अधूनमधून पाऊस कोसळत होता, तरीही गर्दी वाढतच होती. आबालवृद्ध, महिला हात जोडून अंतिम दर्शन घेत होत्या. अनेक जण अनवाणीच चालत होते.
गेल्या वर्षभरापासून तरुणसागरजी असाध्य विकाराने आजारी होते. त्यांना सतत ताप येत असे. त्यानंतर कावीळ झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तरुणसागरजींनी आधुनिक वैद्यकीय उपचार सतत नाकारले. जैन धर्मातील परंपरेचे ते शेवटच्या श्वासापर्यंत पालन करीत होते. त्यांच्या साधनेत एकदाही खंड पडला नाही.
इहलोकीची चाहूल लागताच त्यांनी संथारा घेण्याचा निर्णय घेतला. आपले गुरू पुष्पदत्त सागर यांची अनुमती मिळताच तरुणसागरजींनी संथारास प्रारंभ केला. तत्पूर्वी त्यांच्यावर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधोपचार ते नाकारत होते. त्यांनी नेहमीच वैद्यकीय उपचारास विरोध केला. मात्र इतर जैन मुनींच्या आग्रहामुळे मर्यादित औषधे त्यांनी घेतली. औषधांचा प्रभाव न दिसल्याने शुक्रवारी सायंकाळी त्यांना राधापुरी जैन मंदिरात आणण्यात आले. त्यांच्या प्रकृतीचे वृत्त समजताच जैन मुनी गुप्ती सागर, अरुण सागर, वीर सागर, धवल सागर आदींनी मंदिरात धाव घेतली. योग गुरू बाबा रामदेव यांनीदेखील मंदिरात तरुणसागरजींची विचारपूस केली.
मंदिराच्या सज्जातून शुक्रवारी सायंकाळी तरुणसागरजी यांनी आपल्या अनुयायांना दर्शन दिले व आशीर्वादही दिला. रात्री अकरानंतर त्यांच्या प्रकृतीत अजूनच बिघाड झाला. तेव्हाच ते समाधी आसनात विराजमान झाले. सभोवती जैन मुनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेरीस पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी ते सम्यक समाधीत गेले. या वेळी उपस्थित असलेले जैन मुनी म्हणाले, ‘त्यांची प्रकृती सायंकाळपासून बिघडतच होती. आता ते आपल्या परमोच्च उत्कर्षास पोहोचले आहेत. याचीच साधना त्यांनी आयुष्यभर केली. संयमित साधनेचे फळ समाधीवस्था असते. जैन मुनींच्या सान्निध्यात अत्यंत सचेत परिणामांमध्ये तरुणसागरजींचे समाधीमरण पूर्णत्वास गेले. मुनीश्रींचा आत्मा जिथे असेल तिथे सम्यक दर्शनमय, धर्ममय व सुख-शांतीमय असेल.’ तरुणसागरजी कृष्णनगर स्थित राधेपुरीतील १००८ चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिरात समाधीस्थ झाले. येथेच त्यांचा चातुर्मास सुरू होता. २३ जुलै रोजी चातुर्मास प्रवासात पहिल्यांदा ते या मंदिरात आले. त्याआधी ऋषभ विहार जैन मंदिर व रोहिणीतील जैन मंदिरात त्यांचा प्रवास होता. राधेपुरीतील जैन मंदिरातच समाधी लीन होण्याची इच्छा तरुणसागरजींनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून तेथेच आणण्यात आले. तरुणसागरजींनी कोणत्याही व्यासपीठाची भीडभाड न ठेवता नेहमीच ‘कडवे प्रवचन’ सुनावले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर विधानसभेत प्रवचनासाठी त्यांना निमंत्रित केले होते. १५ मार्च २०१६ रोजी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुनिश्रींचा कार्यक्रम रद्द झाला नि सर्वपक्षीय आमदार त्यांच्या प्रवचनास मुकले!
श्रद्धांजली...
मुनी तरुणसागरजी महाराज यांच्या देहावसनाचे वृत्त समजल्यानंतर दु:ख झाले. ते कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी समाजाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. युवकांवर चांगले संस्कार करुन समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या अनुयायांच्या शोकात मी सहभागी आहे.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
तरुणसागर मुनीश्री यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शोकसागरात बुडालेल्या जैन समाजाबरोबर मी आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुनीवर तरुणसागरजी महाराज यांचा जीवन संदेश आपल्यामध्ये चिरंतन राहील.
- राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष
आपल्या प्रबोधनकारी प्रवचनांतून समाजामध्ये जागृती निर्माण करून त्यास योग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणारे क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनी तरूणसागरजी महाराज यांच्या निधनामुळे जैन तत्त्वदर्शनाचा आदर्श प्रचारक हरपला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुनी तरुणसागरजी महाराज यांच्या निधनामुळे मला दु:ख झाले. त्यांची शिकवण आणि आदर्श मानवतेला नेहमी प्रेरीत करत राहतील.
- अरविंद केजरीवाल,
मुख्यमंत्री, दिल्ली
तरुणसागरजी महाराज यांनी अकाली महासमाधी घेतल्याचे वृत्त ऐकून मी स्तब्ध झालो आहे. ते प्रेरणास्त्रोत, दयेचे सागर होते. भारतीय संत समाजात त्यांच्या निर्वाणामुळे पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो.
- राजनाथसिंह, गृहमंत्री
भारतीय संस्कृती व मूल्यांना आपले विचार व कृतीतून राष्ट्र जीवनात प्रतिष्ठित करणारे एक प्रखर दृढ व सर्वमान्य व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. समाज जीवनात आलेल्या या पोकळीला भरून काढणे शक्य नाही. त्यांच्या पुण्यस्मृतींना शतश: नमन.
- डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
- भय्याजी जोशी, सरकार्यवाह