जैनांच्या मूळ तत्त्वज्ञानाला हिंदुत्वाचा अंगरखा
By admin | Published: October 15, 2015 03:03 AM2015-10-15T03:03:37+5:302015-10-15T03:03:37+5:30
इतिहासाच्या ओळी सोयीस्करपणे बदलणे ही भाजपाच्या हिंदुत्ववादी सरकारची आजवरची ख्याती. मोदी सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्याच्या पुढचे पाऊ ल टाकून जैनांच्या
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
इतिहासाच्या ओळी सोयीस्करपणे बदलणे ही भाजपाच्या हिंदुत्ववादी सरकारची आजवरची ख्याती. मोदी सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्याच्या पुढचे पाऊ ल टाकून जैनांच्या मूळ तत्त्वज्ञानाला व नकाशविद्येलाच हिंदू तत्त्वज्ञानाचा अंगरखा चढवण्याचा घाट घातला आहे. जैन केवळ एक पंथ आहे, त्याचे तत्त्वज्ञान हिंदू पुराणातल्या संस्कृतीतून जन्मलेलाच एक आविष्कार आहे, असे भासवत जाणीवपूर्वक करण्यात आलेले हे धार्मिक आक्रमण आहे. सांस्कृतिक वारशाच्या पुरातत्त्व अभ्यासक सुवर्णा जैन (ंमूळच्या पुण्याच्या व सध्या उत्तराखंडात एका प्रकल्पावर कार्यरत) यांनी या साऱ्या विसंगतीचा उल्लेख करणारे सविस्तर पत्र सांस्कृतिक मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रमोद जैन यांना पाठवले. त्याचे आजतागायत उत्तर मिळालेले नाही. मात्र त्याची कोणतीही दखल मंत्रालयाने घेतलेली नाही.
दिल्लीच्या जनपथावर सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन असलेल्या नॅशनल म्युझियमच्या गॅलरी क्रमांक १ च्या दालनात, ११ आॅगस्टपासून सलग दोन महिन्यांसाठी ‘विश्वाच्या उत्क्रांतीचा तत्त्वज्ञाननिष्ठ अभ्यास आणि नकाशविद्या’ (कॉस्मॉलॉजी अँड कार्टाेग्राफी) या विषयावर एक लक्षवेधी प्रदर्शन भरवण्यात आले. देश विदेशातल्या हजारो पर्यटकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात मांडलेल्या पुरातन जैैन नकाशविद्येशी छेडछाड करून हिंदु संस्कृतीतून जन्मलेलाच हा अविष्कार आहे, अशी माहिती प्रदर्शनात लावलेल्या पॅनल्समधे तसेच या निमित्ताने प्रकाशित ५00 रूपये किमतीच्या माहिती पुस्तिकेत, कॅटलॉगमधे ठोकून देण्यात आली. जैन संस्कृतीच्या पुरातन नकाशांनाही हिंदु युनिव्हर्स आणि हिंदु ब्रम्हांडिकी शीर्षकाच्या छत्रीखाली बळजबरीने घुसवण्यात आले. जैन हा उल्लेख प्रत्येक ठिकाणी टाळण्यात आला आहे.
भारतात जैन हा स्वतंत्र अहिंसावादी धर्म आहे. त्याचे स्वतंत्र धर्मग्रंथ, वेगळे तत्वज्ञान आणि समृध्द सांस्कृतिक वारसा आहे, सुप्रिम कोर्टाने देखील ही बाब पूर्वीच मान्य केली आहे. नॅशनल म्युझियमच्या कॉस्मॉलॉजी अँड कार्टाेग्राफी प्रदर्शनाची सुरूवातच मुळी जैन तत्वज्ञानाच्या नकाशविद्येनुसार जैन कॉसमॉस नकाशा लोका/ लोकपुरूषाच्या पॅनलने होते, त्याला शीर्षक मात्र हिंदु युनिव्हर्स असे देण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या प्रकाशित पुस्तिकेतही जैन तत्वज्ञानाच्या वास्तव घटनांचा उल्लेख टाळून जगभरातल्या पर्यटकांना चुकीचा संदेश प्रसृत करणाऱ्या अनेक गंभीर चुका आहेत.
जैनांच्या पर्युषण पर्वाला वेठीला धरून कत्तलखाने ८ दिवस बंद प्रकरणी हिंदुत्वाचे राजकारण पुढे रेटण्याचा प्रयोग मध्यंतरी मुंबईत झाला. वर्षानुवर्षे पर्युषण पर्व शांततेत साजरा होत असतांना, कोणत्याही जैन संघटनेने अशा अतिरेकी मागण्या केल्या नव्हत्या. कोणालाही त्रास न देणाऱ्या अहिंसावादी धर्माला हिंदुत्वाच्या सोयीस्कर राजकारणासाठी वेठीला धरू नये, अशी मागणी या निमित्ताने विविध जैन संघटनांनी केली आहे.
>> चुकांबाबत माफी मागावी
1 पुण्याच्या अरिहंत जागृती मंच जैन संघटनेचे राजेंद्र सुराणा, टोरँटो-कॅनडाचे दिनेश जैन, लंडनच्या इन्स्टिट्यूट आॅफ जैनॉलॉजीचे नेमू चंदारिया आदींनीही केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा व मंत्रालयाच्या सचिवांना ई-मेलद्वारा अनेक आक्षेपपत्रे पाठवली. चुकांबाबत जैन समाजाची माफी मागावी व पुस्तिकेत आवश्यक ती दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी देशविदेशातील जैन संघटनांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे. मंत्रालयाने ना त्यांना उत्तर पाठवले ना पुस्तिकेत दुरुस्ती केली. पुस्तिकेत महाचुका
2पुस्तिकेच्या पान क्रमांक १६ वर जैन अभिद्विपचा अस्सल नकाशा छापला. त्याचे शीर्षक मात्र पुनश्च हिंदू युनिव्हर्स असे आहे. पान क्र. १७ वर ही नकाशविद्या जैन, बुद्ध व हिंदू धार्मिक ग्रंथातून घेण्यात आल्याचा खरा उल्लेख एके ठिकाणी आहे मात्र हिंदू तत्त्वज्ञानाचेच हे पुनर्रचित स्वरूप असल्याची पुस्ती जोडून त्याचे लगेच खंडन करण्यात आले आहे. पुस्तिकेच्या पान क्रमांक १८ ते २३ व २८ ते २९ वरील जैन नकाशांच्या खाली जैन हा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे.प्रवेश फॉर्ममध्ये नव्हता पर्याय
3पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात मध्यंतरी प्रवेशाच्या फॉर्ममध्ये फक्त ६ धर्मांचे आॅप्शन्स देण्यात आले होते. जैन धर्माचा उल्लेख त्यात नव्हता. धर्म-जैन ही नोंद करण्यास अन्य वा इतर कॉलमची जागाही फॉर्ममध्ये नव्हती. जैन विद्यार्थ्यांना हिंदू हाच आॅप्शन त्यामुळे निवडावा लागत होता. अरिहंत जागृती मंचचे राजेंद्र सुराणा यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर महाविद्यालयाला अखेर फॉर्म बदलावा लागला.