कहानी में ट्विस्ट! किडनॅपरच निघाला मुलाचा बाप; प्रेमात हेड कॉन्स्टेबल बनला होता भिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:52 AM2024-08-31T10:52:04+5:302024-08-31T10:55:33+5:30
किडनॅपर आता मुलाचा बाप असल्याचा दावा करत असून हे मूल त्याच्याकडेच देण्यात यावं असं म्हणत आहे.
जयपूरमध्ये वर्षभरापूर्वी एका मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी किडनॅपरला अटक करून १४ महिन्यांनंतर मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिलं. पण जेव्हा पोलिसांनी आरोपी तनुज चहरला अटक करून आग्राहून जयपूरला आणलं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये असा काही प्रकार घडला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चिमुकला पृथ्वी आई-वडिलांकडे जाण्याच्या ऐवजी किडनॅपरकडे जाण्याचा हट्ट करू लागला.
किडनॅपरला घट्ट मिठी मारून चिमुकला जोरजोरात रडू लागला. हे दृश्य पाहून किडनॅपर आणि तेथे उपस्थित असलेले पोलीस या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की मुलाचं किडनॅपरशी असं नेमकं काय नातं आहे की तो आई-वडिलांऐवजी किडनॅपरशी इतका भावूक झाला आहे. पण आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण प्रेमसंबंधाशी संबंधित आहे. या घटनेत ज्या व्यक्तीचं किडनॅपर म्हणून वर्णन केलं जात आहे तोच मुलाचा पिता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तनुज चहर असं या किडनॅपरचं नाव असून तो उत्तर प्रदेशमधील निलंबित हेड कॉन्स्टेबल असून सध्या मुलाचं अपहरण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. किडनॅपर आता मुलाचा बाप असल्याचा दावा करत असून हे मूल त्याच्याकडेच देण्यात यावं असं म्हणत आहे.
किडनॅपरने हे मूल माझंच असून डीएनए टेस्ट करा असं म्हटलं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची आई ही किडनॅपर तनुजच्या आत्याची मुलगी असून, जिच्यावर त्याचं अनेक वर्षांपासून प्रेम होतं. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची माहिती मिळाल्यावर त्यांनी विरोध केला. यानंतर घरच्यांनी मुलीचं जयपूरमध्ये गुपचूप लग्न लावून दिलं.
प्रेमात विभक्त झाल्यानंतर तनुजने पोलीस दलातील नोकरी सोडली आणि गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी तो भिकारी बनला. इतकंच नाही तर तिच्या शोधात जयपूरमध्ये वर्षभर फूटपाथवर रात्र काढली आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह केला. त्याने हळूहळू मुलाच्या आईला शोधलं आणि तिच्या पतीसोबत बोलू लागला. तिच्या घरी जाऊ लागला.
काही महिन्यांनी महिला गरोदर राहिली आणि तिने पृथ्वीला जन्म दिला पण त्यानंतर अचानक तिने तनुजशी संबंध तोडले. तनुजने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि तिला मुलासह त्याच्यासोबत येण्यास सांगितलं. पण ती तयार झाली नाही. तेव्हा १४ जून २०२३ रोजी तो तिच्या घरी गेला आणि ११ महिन्यांच्या मुलाला घरातून जबरदस्तीने नेलं, त्याचं अपहरण केलं. आता पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आणि तनुजला अटक केली आहे.