बापरे! सूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:19 AM2020-01-22T11:19:39+5:302020-01-22T11:25:24+5:30
सूर्यग्रहण पाहिल्याने काही मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जयपूर - 2019 या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 26 डिसेंबरला पाहाण्याचा आनंद अनेकांनी घेतला होता. देशाच्या बहुतांश भागात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालं. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्याने विलोभनीय दृश्य दिसलं. सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक ठिकाणी खास व्यवस्थाही करण्यात आली होती. शाळांनीही मुलांना सूर्यग्रहणाची माहिती दिली होती. सूर्यग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक असतं. उघड्या डोळ्यांनी ग्रहण न पाहण्याचा सल्ला हमखास दिला जातो. सूर्यग्रहण पाहिल्याने काही मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. मुलांचे 70 टक्के डोळे यामुळे खराब झाल्याची माहिती मिळत आहे. 26 डिसेंबर रोजी गुजरातमधल्या द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. सकाळी 7 वाजून 59 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत म्हणजेच एकूण 5 तास 36 मिनिटं हे सूर्यग्रहण होतं. अनेकांनी यावेळेत ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. जयपूरमध्ये काही शाळकरी मुलांच्या डोळ्यांवर सूर्यग्रहणाचा गंभीर परिणाम झाला आहे. मुलांचे डोळे 70 टक्के खराब झाले आहेत.
सूर्यग्रहण पाहताना चष्मा न घातल्यामुळे तसेच कोणतीही काळजी न घेतल्याने डोळे खराब झाल्याची माहिती मिळत आहे. सूर्यग्रहण पाहिल्यानंतर काहीवेळातच काही मुलांना थोड्या वेळासाठी डोळ्यांनी दिसणं बंद झालं. तर काहींना डोळ्यांनी अस्पष्ट दिसत होतं. गेल्या 20 दिवसांपासून सवाई मानसिंह रुग्णालयात मुलांच्या डोळ्यांसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. शाळेतील मुलांसोबतच काही नागरिकांच्याही डोळ्यांबाबत अशा तक्रारी येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
रुग्णालयातील नेत्र विभागात मुलांवर योग्य उपचार सुरू असून लवकरात लवकर त्यांना नीट दिसावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सूर्यग्रहण पाहताना काळजी न घेतल्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा झाल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. रुग्णालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. कमलेश खिलनानी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, सूर्यग्रहणांमुळे ज्या मुलांच्या डोळ्यावर विपरित परिणाम झाला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र गंभीर इजा आहे. मुलांच्या डोळ्यातील रेटीनावर फार गंभीर परिणाम झाला आहे.
चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहण्यापेक्षा टीव्हीमध्ये बघून सुध्दा ग्रहणाचे निरीक्षण करता येते. कारण या बाबतीत जर कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारली तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड
...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना
ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश
बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला
उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली