अबब! तब्बल 100 लक्झरी कार चोरणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 12:59 PM2018-06-07T12:59:27+5:302018-06-07T12:59:27+5:30
आरोपीने 16 महिन्यात 100 गाड्या चोरल्या.
जयपूर- जयपूर पोलिसांनी बुधवारी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने तब्बल 100 गाड्या चोरल्या होत्या. पैकी 60 गाड्या या दिल्लीतील लक्झरी गाड्या होत्या. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून या गाड्यांची चोरी करण्यात आली होती. राजेश मीना उर्फ राहुल असं या मास्टरमाइंड चोराचं नाव असून तो दौरा येथिल रहिवासी आहे. या चोराक़ून तीन महागड्या गाड्या व बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. राजेश ज्या ठिकाणी लपतो त्या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली. तेथून इलेक्ट्रॉनिक चिप्स, ट्रान्समीटर आणि इतर हायटेक यंत्रणा पोलिसांनी जप्त केली. 16 महिन्यात 100 गाड्यांची चोरी केली असून त्यातील 60 गाड्या नवी दिल्लीतून आणि 40 गाड्या जयपूरमधून चोरल्याची कबूली चोराने दिली.
गेल्या काही महिन्यापासून गाड्या चोरी जाण्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधिकारी मनोज चौधरी आणि दीपक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल टीम तैनात करण्यात आली होती. आरोपीने 16 महिन्यात 100 गाड्या चोरल्या, असं पोलीस अधिकारी विकास पाठक यांनी म्हटलं.
दिल्लीतून चोरी केलेल्या गाड्या आरोपी उत्तर प्रदेशच्या इटवामध्ये विकायचा. तर जयपूरमधून चोरलेल्या गाड्या राजस्थानच्या पाली, जोधपूर, अजमेर, जालोर आणि हरियाणाच्या काही भागात विकायचा, अशी माहिती पाठक यांनी दिली.
आरोपीने या अलिशान गाड्या विकून जयपूरमधील कॉलनीमध्ये महागडं घर आणि एक एसयुव्ही गाडी खरेदी केली होती.