बापरे! 2 वर्षांचा चिमुकला सतत रडायचा; रिपोर्ट पाहून डॉक्टरांना मोठा धक्का, झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:50 AM2022-03-04T11:50:19+5:302022-03-04T12:06:44+5:30
पालक जेव्हा मुलाला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा त्यांना सत्य ऐकून मोठा धक्काच बसला. मुलाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले.
नवी दिल्ली - लहान मुलांक़डे दुर्लक्ष करणं कधी कधी महागात पडू शकते. काही वेळा ते त्यांच्या जीवावर देखील बेततं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्याला गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. तो सतत रडायचा. यासाठी त्याचे पालक जेव्हा त्याला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा त्यांना सत्य ऐकून मोठा धक्काच बसला. मुलाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. कारण या मुलाच्या लिव्हरमध्ये चक्क एक सुई अडकली होती. ज्यामुळे त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. डॉक्टरांना ही सुई बाहेर काढण्यात आता यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मजूर दाम्पत्य आपल्या 2 वर्षांच्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेलं होतं. तिथे त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यानंतर उपचारासाठी मुलाला तिथून सवाई मान सिंह रुग्णालयात पाठवण्यात आलं. डॉ. अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकल्याला काही दिवसांपूर्वी जयपूरच्या हॉस्पिटलमधून पाठवण्यात आलं होतं. त्याचे एक्स-रे, सिटी स्कॅन आणि इतर रिपोर्ट पाहिले. त्यात सुरुवातीला सुई फुफ्फुसाजवळ अडकल्याचं दिसलं.
लिव्हरमधून जवळपास 2 इंच लांब सुई काढली
जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करायला गेले तेव्हा सुई तिथून लिव्हरमध्ये गेली होती. त्यामुळे ऑपरेशनची जागा बदलावी लागली. मुलाच्या लिव्हरमधून जवळपास 2 इंच लांब सुई काढली. तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ हे ऑपरेशन सुरू होतं. लिव्हरमधून सुई काढण्याचं हे पहिलं प्रकरण आहे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. याआधी मटार किंवा शर्टाचं बटण आणि इतर लहान वस्तू मुलांनी गिळल्याचे प्रकार समोर आले आहेत. पण अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे.
सुई दोन वर्षांच्या मुलाच्या शरीरात नेमकी गेली तरी कशी यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. कारण जर त्याने तोंडातून सुई गिळली असती तर ती त्याच्या पोटातून आतड्यात जाऊन तिथं हानी पोहोचली असती. सुई फुफ्फुसातून लिव्हरमध्ये गेली आणि तिथे अडकली. पालकांनाही ही सुई मुलाच्या शरीरात कशी गेली याची माहिती नाही. मुलाचं ऑपरेशन करण्यात आलं असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.