जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:46 IST2024-12-20T18:46:36+5:302024-12-20T18:46:49+5:30
कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले.

जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार
Jaipur Accident : राजस्थानच्या जयपूरमध्ये आज एक भीषण अपघात घडला. जयपूर ते अजमेर महामार्गावर सकाळी 6.30 च्या सूमारास गॅस टँकर आणि ट्रकच्या अपघातात अनेकजण होरपळले, त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात अचानक झाल्यामुळे कुणालाही काही करता आले नाही. या घटनेत रस्त्यावरील अनेक वाहने आणि रस्त्याच्या कडेला असलेला कारखाना जळून खाक झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-अजमेर महामार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर एलपीजीने भरलेला टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता. यादरम्यान टँकरने यू टर्न घेतला. इतर वाहनांनी ब्रेक लागला आणि टँकर जाण्याची वाट पाहत होते. इतक्यात जयपूरहून भरधाव ट्रक आला आणि टँकरला धडकला. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टँकरमधून गॅस गळती झाली आणि क्षणात गॅसने पेट घेतला. वायू वेगाने पसरल्याने आगही तितक्याच वेगाने पसरली आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर व्यापला गेला.
भांकरोटा में हुआ हादसा कितना भयावह था, इस सीसीटीवी फुटेज से अंदाजा लगाया जा सकता है। कुछ ही सैकेंड में आग का गोला दूर तक फैल गया। #jaipuraccidentpic.twitter.com/0HhAgcaTt4
— Versha Singh (@Vershasingh26) December 20, 2024
लोकांना काय झाले, हे समजेपर्यंत संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला होता. कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले. हळूहळू महामार्गावरुन जाणारी इतर अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झाले. या भीषण अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीररित्या भाजले गेले आहेत. जखमींवर सवाई मानसिंग रुग्णालयात उपचार सरू आहेत. जखमी 32 पैकी 15 रुग्ण 50 टक्क्यांहून अधिक भाजलेले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.
40 हून अधिक वाहनांना आग
या घटनेनंतर काही सेकंदात एकामागून एक 40 कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुरुवातीला ही आग 200 मीटर परिसरात पसरली पण नंतर ती सुमारे 1 किलोमीटर परिसरात पसरली. रस्त्याच्या कडेला अलेल्या पाईप फॅक्टरीलाही आग लागली. विशेष म्हणजे, जिथे हा भीषण अपघात झाला, तिथून अवघ्या 100 मीटर अंतरावर कच्च्या तेलाची पाइपलाइन जात होती. सुदैवाने आग तिकडे गेली नाही.