सिनेमाला शोभावी अशीच आहे भाजपा उमेदवार असलेल्या 'या' राजकुमारीची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:36 PM2019-04-08T13:36:19+5:302019-04-08T14:08:50+5:30

जयपुरच्या राजकुमारी दीया कुमारी यांची लव्हस्टोरी जी एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशीच आहे.

Jaipur Princess and BJP Candidate Diya Kumari love story and divorce after 21 year | सिनेमाला शोभावी अशीच आहे भाजपा उमेदवार असलेल्या 'या' राजकुमारीची लव्हस्टोरी!

सिनेमाला शोभावी अशीच आहे भाजपा उमेदवार असलेल्या 'या' राजकुमारीची लव्हस्टोरी!

googlenewsNext

(Image Credit : Facebook)

जयपुरच्या राजकुमारी दीया कुमारी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांना भाजपाकडून राजसमंदमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राजकुमारी दीया कुमारी या त्यांच्या सुंदरतेसाठी नेहमीच चर्चेत असतात. याआधी त्यांची सर्वात जास्त चर्चा झाली होती ती पती नरेंद्र कुमार यांच्याकडून जानेवारीमध्ये घटस्फोटाची. राजकुमारी दीया कुमारी यांच्या घटस्फोटाची जितकी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या लव्ह मॅरेजची झाली होती. केवळ राजस्थानच नाही तर देशभरात या लग्नाची चर्चा रंगली होती. कारण त्यांनी कुण्या राजघराण्यातील राजकुमाराशी नाही तर एका सामान्य व्यक्तीसोबत गुपचूप कोर्टात लग्न केलं होतं. त्यांच्या या लग्नाला दोन्ही परिवाराकडून विरोध होता. 

डिसेंबरमध्ये जेव्हा राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा राजकुमारी दीया कुमारी यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणूक लढण्यास नकार दिला होता. असे सांगितले जात होते की, त्या आणि पती नरेंद्र कुमार हे पाच ते सहा वर्षांपासून वेगळे राहत होते. काही कारणांवरुन त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे ते वेगळे राहत होते. पण एकेकाळी सर्वांचा विरोध धुडकावून लावत राजकुमारी दीया कुमारी यांनी नरेंद्र यांच्याशी लग्न केलं होतं. 

जेव्हा त्यांची लव्हस्टोरी २१ वर्षांआधी मीडियासमोर आली तेव्हा असे कळाले होते की, त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन दिल्लीत गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. तसेच तेव्हा अशीही चर्चा रंगली होती की, नरेंद्र राजकुमारीच्या अकाऊंट विभागात नोकरी करत होते. काहींनी म्हटलं होतं की, ते त्यांचे ड्रायव्हर होते. पण नंतर दीया कुमारी यांनी एक ब्लॉग लिहून या चुकीच्या चर्चा होत असल्याचं सांगितलं होतं. 

दीया कुमारी या जयपुरचे महाराज सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक कन्या. त्यांनी २०१३ मध्ये भाजपाच्या तिकीटावर सवाईमाधोपुरमधून विधानसभा सीट जिंकली होती. दीया कुमारी यांनी त्यांचं शिक्षण नवी दिल्ली, जयपुर आणि नंतर लंडन इथे केलं होतं. दीया कुमारी आणि नरेंद्र सिंह यांना दोन मुलं पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह आहेत. आणि एक गौरवी ही मुलगी आहे. दीया कुमारी यांनी १९९७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानी एका ब्लॉगच्या माध्यमातून त्यांची लव्हस्टोरी जगासमोर आणली होती. 

(Image Credit : AmarUjala)

त्यांनी लिहिले होते की, ज्याप्रकारे मीडियात केवळ अंदाज बांधले जात आहेत, ते मला अजिबात पसंत आलं नाही. ज्या व्यक्तीला मी भेटले आणि नंतर त्याला जीवनसाथी करण्याचा निर्णय घेतल्या त्या व्यक्तीबाबत मीडियाला काहीच माहीत नाही. त्यांनी म्हटले होते की, भलेही मी राजघराण्याशी संबंधित आहे. पण मी बाहेरच्या दुनियेतील लोकांशी संपर्कात होती. माझ्या पालकांनी एका मोकळ्या वातावरणात लहानाचं मोठं केलं. तेव्हाच मी वेगवेगळ्या लोकांना भेटू शकले आणि मित्र बनवले. मी एका सामान्य मुलीप्रमाणे राहते. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, जेव्हा मी १८ वर्षांची होते तेव्हा मी पहिल्यांदा नरेंद्र कुमार राजावत यांना भेटले होते. ते ना आमच्याकडे कॅशिअर होते, ना ते आमच्याकडे ड्रायव्हर होते. मीडियाने चुकीचं लिहिलं आहे. 

माझं लग्न एका परिकथेसारखं नक्कीच होतं. पण माझे पती सामान्य व्यक्ती नव्हते. ते एक चार्टर्ड अकाऊंटंट होते. त्यांच्या याच शिक्षणाशी संबंधित कामामुळे त्यांनी आमच्या एसएमएस म्युझिअम ट्रस्टच्या अकाऊंट विभागात जॉइन केलं होतं. जेणेकरुन त्यांना अनुभव मिळावा आणि त्यांना शिकता यावं. या विभागात ते तीन महिने होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चं कन्स्ट्रक्शनचं काम सुरु केला होता. 

(Image Credit : dbpost)

राजकुमारी दीया कुमारी यांनी ब्लॉग रॉयल्टी ऑफ राजपूताना लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले की, नरेंद्र कुमार जेव्हा त्यांच्या अकाऊंट विभागात आले तेव्हा आमची भेट झाली. ते मला आवडले होते. पहिल्यांदा आम्ही महालात भेटलो. काही कामानिमित्त ते आले होते. मी सुद्धा अकाऊंटचं काम पाहत होते त्यामुळे त्यांना काही काम सांगितलं. त्यानंतर आमचं बोलणं वाढलं. मला त्यांच्यासोबत चांगलं वाटलं. त्यांची सहजता आणि इमानदारीने मी प्रभावित झाले होते. 

पहिल्या नजरेच्या प्रेमात माझा विश्वास नाही. त्यानंतर आमच्या काही भेटी झाल्या. तीन महिन्यांनी जेव्हा ते अकाऊंट विभागातून ट्रेनिंग संपवून गेले, तेव्हा मला त्यांना भेटण्याची इच्छा होऊ लागली होती. जेव्हाही ते जयपुरला यायचे आम्ही कॉमन फ्रेन्डकडे भेटायचो. आता आमची चांगलीच मैत्री झाली होती. पण जेव्हा मी पॅरेंट्ससोबत परदेशात गेले तेव्हा मला त्यांची खूप आठवण येऊ लागली होती. माझं त्यांच्यांवर प्रेम जडलं होतं. मला सतत त्यांच्यासोबत रहावं वाटत होतं. हे मी आईला सांगितले तेव्हा ती नाराज झाली. त्यांची इच्छा होती की, माझं लग्न राजघराण्यात व्हावं. त्यामुळे मी माझं प्रेम विसरावं असं त्यांना वाटत होतं. आईने वडिलांना याबाबत काही सांगितलं नाही.

(Image Credit : picswe.com)

यानंतर आम्ही फार काळजीपूर्वक भेटत होतो. दिल्लीमध्ये आम्ही जास्त भेटायचो. इथे एका मित्राच्या घरी आम्ही भेटायचो. पण हे माझ्या घरच्या लोकांना कळालं. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी मुलगा शोधणं सुरू केलं. काही मुलांना मी भेटले सुद्धा. माझी स्थिती फार वेगळी होती. मला माझ्या आई-वडिलांची चिंताही समजत होती. मी नरेंद्रसोबत नातं संपवण्याचा प्रयत्नही केला. आम्ही एकमेकांशी बोलणंही बंद केलं होतं. मी सहा ते सात महिने त्यांच्यांशी बोलले नाही. पण याचा काही फायदा झाला नाही. प्रेम अधिक वाढत गेलं आणि लग्नाची इच्छाही.

त्यांनी लिहिले की, ते सहा महिने फार वाईट होते. सहा वर्ष एकमेकांना जाणून घेतल्यानंतर आम्ही १९९४ मध्ये दिल्लीतील आर्य समाजात लग्न केलं. त्यानंतर आम्ही लग्न कोर्टातही रजिस्टर केलं. पण याबाबत मी घरी काहीच सांगितलं नाही. एकदा मी आई आणि वडिलांना सांगितलं की, मला या व्यक्तीशी लग्न करायचं आहे. तोपर्यंत मी त्यांना लग्न केल्यांचं सांगितलं नव्हतं. अखेर १९९६ मध्ये मी त्यांना लग्न केल्याचं सांगितलं. 

(Image Credit : YouTube)

एखाद्या सिनेमाची कथा शोभावी असं हे लग्न झालं. त्यानंतर १९९७ मध्ये राजकुमारी दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार सिंह यांचं भव्य लग्न लावून देण्यात आलं. पण राजपूत समुदायाने एकाच गोत्रामुळे या लग्नाला विरोधही केला होता. या कारणामुळे दीया यांचे वडील राजा भवानी सिंह यांना राजपूत महासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. १९ वर्ष हा वाद सुरू होता. 

पण अचानक या लव्हस्टोरीमध्ये एक वेगळं वळण आलं. दोघांमध्ये वादाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार ५ वर्षांपासून वेगळं राहत असल्याची चर्चा होऊ लागली होती. पण त्यानंतर पुन्हा एकदा दोघांनी सोबत राहण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दोघे वेगळे झाले. यादरम्यान जयपुर फॅमिली कोर्टात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोघेही वेगळे झालेत. 

Web Title: Jaipur Princess and BJP Candidate Diya Kumari love story and divorce after 21 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.