"प्लीज, आई-बाबांची ट्रान्सफर..."; 2 चिमुकल्या मुलींनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं इमोशनल पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:58 PM2024-02-27T15:58:59+5:302024-02-27T16:01:42+5:30
12 वर्षांच्या अर्चिता आणि अर्चना या दोन्ही बहिणींना आई-वडिलांसोबत राहून शिक्षण घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.
लहान असताना पालकांशिवाय राहिल्याने मुलांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. अनेक पालक छोट्या शहरात किंवा गावांमध्ये बदली झाल्यावर, आपल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे शिक्षणासाठी ठेवतात. जेणेकरून मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल. मात्र अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्या पालकांची खूप आठवण येते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
जयपूरमध्ये राहणाऱ्या 12 वर्षांच्या अर्चिता आणि अर्चना या दोन्ही बहिणींना आई-वडिलांसोबत राहून शिक्षण घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी लिहिलं की, "माननीय पंतप्रधान मोदीजी, माझं नाव अर्चिता आणि माझ्या बहिणीचं नाव अर्चना आहे. आम्ही दोघी 12 वर्षांच्या आहोत. आम्ही दोघीही दिल्ली पब्लिक स्कूल, बांदीकुई येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आहोत. आम्ही दोघी आमच्या काका-काकींकडे राहतो."
"आमच्या वडिलांचे नाव देवपाल मीना आणि आईचं नाव हेमतला कुमारी मीना असं आहे. आमचे वडील पंचायत समिती चौथण येथे सहायक लेखाधिकारी म्हणून काम करतात. आमची आई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, देवडा ब्लॉकमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. आम्हाला दोघींना आमच्या आई-वडिलांची खूप आठवण येते आणि त्यांच्याशिवाय आमचं अभ्यासात मन लागत नाही. आमच्या आई-वडिलांची बदली जयपूर, राजस्थान येथे व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्हालाही जयपूरला आमच्या पालकांसोबत राहून तिथे शिक्षण घ्यायचे आहे."
"बेटी बचाओ, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना इत्यादी तुमच्या अनेक योजना आम्ही ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. त्यामधून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे. आम्हालाही आमच्या पालकांसोबत राहून त्यांचं नाव खूप मोठं करायचं आहे. कृपया आमच्या पालकांची जगतपुरा, जयपूर येथे बदली करा. आम्ही तुमचे अत्यंत ऋणी राहू." मुलींनी यानंतर खाली त्यांची नावं लिहिली आहेत.