झायरा वसीम छेडछाड : सहप्रवासी म्हणाला, आरोपी निर्दोष; वकील म्हणतात पॉस्को लावणं चुकीचं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 05:22 PM2017-12-12T17:22:12+5:302017-12-12T17:24:00+5:30
झायरा वसीम आणि आरोपी विकास हे विस्ताराच्या ज्या विमानाने प्रवास करत होते त्याच क्लासमध्ये मी देखील प्रवास करत होतो. विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेताच आरोपी आपल्या सीटवर झोपी गेला, त्याची एवढीच चुकी होती की झोपेत त्याने समोरच्या खुर्चीवर पाय टाकला...
मुंबई: दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीम छेडछाड प्रकरणात आरोपी विकास सचदेव आणि झायरा वसीम यांच्यासह प्रवास करणारा एक प्रवासी समोर आला आहे. आरोपी विकासने केवळ खुर्चीवर पाय ठेवला होता त्या व्यतिरिक्त चुकीचं त्याने काहीही केलं नाही असं या सहप्रवाशाने म्हटलं आहे.
झायरा वसीम आणि आरोपी विकास हे विस्ताराच्या ज्या विमानाने प्रवास करत होते त्याच क्लासमध्ये मी देखील प्रवास करत होतो. विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेताच आरोपी आपल्या सीटवर झोपी गेला, त्याची एवढीच चुकी होती की झोपेत त्याने समोरच्या खुर्चीवर पाय टाकला...त्या व्यतिरिक्त त्याची काही चुकी होती असं मला वाटत नाही असं त्या सहप्रवाशाने मुंबई पोलिसांना सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. मुंबईत विमान लॅंड होत असताना या प्रकारावर झायरा ओरडली, ती किंचाळल्यानंतर विकासने तिची माफी देखील मागितली होती अशी माहिती या प्रवाशाने मुंबई पोलिसांना दिली आहे. दुसरीकडे विकास सचदेवाचे वकील हरमिंदर आनंद यांनी या प्रकरणात पॉस्को कायद्यांतर्गत कलम लावणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण -
झायरा वसीमनं आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. झायरा वसीम शनिवारी दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘1 एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘2 एफ’ वर 45 वर्षांचा एक इसम बसलेला होता. नऊ वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराच्या मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली. मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती 17 वर्षीय झायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केली. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित प्रवाशाविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह राजकीय, सामाजिक व बॉलिवूडमधील विविध मान्यवरांनी याबाबत सोशल मीडियावरुन निषेध नोंदवत संबंधित विकृत प्रवाशावर कठोर कारवाईची मागणी केली होती.