'सल्तनत चली गई, फिर भी सुलतानो की तरह बर्ताव', जयराम रमेश यांचा काँग्रेसला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 12:13 PM2017-08-08T12:13:40+5:302017-08-08T12:24:38+5:30
काँग्रेससमोर सध्या राजकीय नाही तर अस्तित्वाचं संकट उभं आहे असं वक्तव्य करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे
कोची, दि. 8 - काँग्रेससमोर सध्या राजकीय नाही तर अस्तित्वाचं संकट उभं आहे असं वक्तव्य करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे समोर आलेल्या नव्या आव्हानांशी लढा देण्यासाठी सर्व नेत्यांनी येऊन एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही ते बोलले आहेत. सोबतच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी लढा द्यायचा असेल तर हलकेपणाने घेणं सोडलं पाहिजे असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला आहे. आपली काम करण्याच्या पद्दतीत लवचिकता आणण्याची काँग्रेसला गरज असल्याचा सल्लाही त्यांनी स्वपक्षाला दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश यांनी तिखट शब्दांत काँग्रेसला सुनावलं आहे.
'हो काँग्रेस खूप मोठ्या संकटाला सामोरं जात आहे', अशी कबुलीच जयराम रमेश यांनी दिली आहे. काही नेते अजूनही सत्तेत असल्याप्रमाणे वागतात असा प्रश्न विचारला असता, 'संस्थानं खालसा झाली, पण राजेशाही काही गेलेली नाही. आम्ही अजूनही राजे असल्याप्रमाणेच वागतो. आम्हाला पुर्णपणे बदलण्याची गरज आहे', असा टोला लगावला.
'काँग्रेसला वागण्यात, बोलण्यात, संवाद साधण्याच्या पद्दतीत बदल करण्याची गरज आहे. मला वाटतं लोक अजूनही काँग्रेसला पाठिंबा देतात, पण त्यांना नवा काँग्रेस पक्ष पाहायचा आहे. त्यांना त्या जुन्या घोषणा, जुनी विचारपद्धती नको आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे', असं जयराम रमेश बोलले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'काँग्रेसने 1996 ते 2004 दरम्यान सत्तेत नसताना राजकीय संकटाचा सामना केला आहे. त्याआधी 1977 साली आणीबाणीनंतर पार पडलेल्या निवडणुकीनंतरही काँग्रेससमोर राजकीय संकट उभं राहिलं होतं. पण आज काँग्रेसमोर वेगळं संकट उभं राहिलं असून ते अस्तित्व टिकवण्यासाठीचं आहे. हे राजकीय संकट नाही. पक्ष खूप मोठ्या संकटात आहे.
'आपली लढाई पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे. ते वेगळ्या दृष्टीने विचार करतात, वागतात. जर आपण आपल्या दृष्टीकोनात लवचिकता आणली नाही, तर आपण कालबाह्य ठरू', अशी भीती जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्याच्या प्रश्नावर बोलताना, 2017 संपेपर्यंत घोषणा होऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सोबतच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी योग्य व्यक्ती नसल्याचंही ते बोलले आहेत. 'याआधी 2015 मध्ये होईल असं वाटतं, पण झालं नाही. त्यानंतर 2016मध्येही वाटलं, पण तेव्हाही चुकीचा ठरलो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. 2017 च्या शेवटी होईल असा अंदाज आहे', असं त्यांनी सांगितलं.
2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना टक्कर देईल असा कोणी काँग्रेस पक्षात आहे का ? असं विचारलं असता, 'मोदी हे कोणी जादूगार नसूल, एकत्रितपणे लढा दिल्यास काँग्रेस वरचढ ठरु शकतो', असं त्यांनी सांगितलं.