जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, भाजपाच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 02:13 PM2017-12-24T14:13:13+5:302017-12-24T15:21:14+5:30
भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ जयराम ठाकूर यांच्या गळ्यात पडली आहे.
सिमला - भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ जयराम ठाकूर यांच्या गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने निर्विवाद बहुमत मिळूनही हिमाचलमधील भाजपा नेत्यांममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. त्यात अखेर हिमाचल प्रदेशमधील माजी भाजपाध्यक्ष जयराम ठाकूर यांनी बाजी मारली.
Jairam Thakur to be the Legislature party leader in Himachal Pradesh: Narendra Singh Tomar, Central Observer
— ANI (@ANI) December 24, 2017
भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयराम ठाकूर हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्यानंतर जयराम ठाकूर यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आले होते. दरम्यान, आज झालेल्या भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी जयराम ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर उपस्थित आमदारांनी या प्रस्तावास एकमताने समर्थन दिले. ठाकूर यांच्या निवडीची माहिती केंद्रीय पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Jairam Thakur to be the Legislature party leader in Himachal Pradesh: Narendra Singh Tomar, Central Observer pic.twitter.com/q319dmgOzl
— ANI (@ANI) December 24, 2017
मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर जयराम ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते प्रेमकुमार धुमल यांचे आभार मानले. तसेच हिमाचलच्या जनतेने आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही जयराम ठाकूर यांनी दिले.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून दूर करून, सत्ता ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले होते. ६८ जागांच्या विधानसभेतील ४४ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकल्या असून, मार्क्सवादी पक्षाने १ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.
मात्र या निवडणुकीतील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा सुजानपूर मतदार संघात काँग्रेसचे राजिंदर राणा यांच्याकडून ३,५०० मतांनी पराभव झाला होता. धुमल यांचा हमीरपूर पारंपरिक मतदारसंघ, परंतु या वेळी त्यांनी तो बदलला. मतदानाच्या फक्त ९ दिवस आधी धुमल यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते.