पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 10:26 AM2019-09-09T10:26:59+5:302019-09-09T10:32:46+5:30
गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली: पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका केल्याची माहिती गुप्तचर विभागानं सरकारला दिली आहे. राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याची कुमक वाढवण्यात आल्यानं सतर्क राहण्याचा इशारादेखील गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 रद्द करण्यात आल्यानं पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठा हल्ला करण्याची तयारी पाकिस्तानकडून सुरू असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं इंग्रजी वृत्तपत्र 'हिंदुस्तान टाईम्स'नं दिलं आहे.
पाकिस्तान सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत आहे. गेल्याच महिन्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. भारताचं हे पाऊल पाकिस्तानला चांगलचं खुपलं. त्यानंतर अनेकदा पाकिस्ताननं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात पूर्णपणे अपयश आल्यानं आता पाकिस्ताननं पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. यानंतर सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाकिस्ताननं राजस्थानच्या सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात केलं आहे. याची माहिती गुप्तचर विभागानं सीमा सुरक्षा दलाला दिली आहे. राजस्थानसह काश्मीरमध्येही हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी याबद्दल अप्रत्यक्ष संकेत दिले होते. 'काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. याप्रकरणी पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देईल आणि याला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार असेल,' अशी धमकी खान यांनी दिली होती.