Breaking! जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू? पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 05:46 PM2019-03-03T17:46:16+5:302019-03-03T18:21:46+5:30

अद्याप पाकिस्तान सरकारनं याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही

Jaish e Mohammed chief Maulana Masood Azhar is dead no confirmation from Pakistan yet | Breaking! जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू? पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

Breaking! जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू? पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

Next

इस्लामाबाद: जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र अद्याप पाकिस्तान सरकारनं याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचं वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलं आहे. 

सैन्य तज्ज्ञांच्या मते, 'भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये मसूद अजहर गंभीर जखमी झाला होता. त्याला पाकिस्तानातील लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या मृत्यूचं श्रेय भारताला मिळू नये म्हणून पाकिस्ताननं अजहरचा मृत्यू लिव्हर कॅन्सरनं झाला असल्याचं खोटं कारण दिलं आहे.' 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईनं जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरचा या कारवाईत खात्मा झाला. याशिवाय मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत मारला गेला. याच हल्ल्यात मसूद अजहर गंभीर झाल्याचं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौलाना मसूद अजहरचा उल्लेख केला होता. अजहर पाकिस्तानात असून त्याची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. अजहरवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं. पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. 

भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे. 

Web Title: Jaish e Mohammed chief Maulana Masood Azhar is dead no confirmation from Pakistan yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.