भारतावर हल्ला करण्यासाठी जैश, आयएसआयची बैठक; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 10:04 AM2020-08-25T10:04:26+5:302020-08-25T10:07:25+5:30

रावळपिंडीत जैश ए मोहम्मद आणि आयएसआसची बैठक; भारतावर मोठा हल्ला करण्याच्या योजनेवर चर्चा

jaish E Mohammed Isi Meeting At Rawalpindi Indian Intelligence Agencies On High Alert | भारतावर हल्ला करण्यासाठी जैश, आयएसआयची बैठक; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

भारतावर हल्ला करण्यासाठी जैश, आयएसआयची बैठक; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Next

नवी दिल्ली: भारतावर मोठा हल्ला घडवण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच रावळपिंडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये एक गोपनीय बैठक झाली. यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या बैठकीची माहिती मिळताच भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

२० ऑगस्टला जैशचा दहशतवादी अमीर मौलाना अब्दुल रौफ असगरनं (मसूद अजहरचा भाऊ) रावळपिंडीत आयएसआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला अशगरचा भाऊ मौलाना अम्मारदेखील उपस्थित होता. बालाकोटवरील एअर स्ट्राईकनंतर भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान सरकारनं सुटका केली. त्यानंतर अम्मारनं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याची ध्वनीफित व्हायरल झाली होती. बालाकोट हल्ल्याचा बदला घेऊ, अशी धमकी त्यानं तालीम-उल-कुरानमधील मदरशात दिली होती.

गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीत अब्दुल रौफ आणि आयएसआयमध्ये एक बैठक झाली. या बैठकीचं आयोजन इस्लामाबादमधून करण्यात आलं होतं. जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी जरारनं भारतावरील हल्ले भारतावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याच्या योजनेवर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच बैठक पुलवामा हल्ल्याच्या आधीदेखील झाली होती.

कोण आहेत अशगर खान काश्मिरी आणि कारी जरार?
अशगर खान काश्मिरी आधी दहशतवादी संघटना हरकतउल मुजाहिद्दीनच्या मजलिस ए शूराचा सदस्य होता. त्यानंतर त्यानं त्याच्या काही साथीदारांसह जैश-ए-मोहम्मद संघटनेत प्रवेश केला. तर कारी जरार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लॉन्चिंग पँडचा कमांडर आहे. २०१६ मध्ये नगरोटामधील लष्करी तळावर हल्ला झाला. जरार त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.
 

Web Title: jaish E Mohammed Isi Meeting At Rawalpindi Indian Intelligence Agencies On High Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.