डोवालांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा 'प्लॅन', जैशच्या दहशतवाद्याकडून NSA कार्यालयाची रेकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 01:43 PM2021-02-13T13:43:07+5:302021-02-13T13:44:24+5:30
डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये डोवालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत.
नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) एका दहशतवाद्याने केलेल्या मोठ्या खुलाशानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोवाल (Ajit Doval) यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पाकिस्तान स्थित हँडलरच्या सांगण्यावरून आपण राजधानी दिल्लीत सरदार पटेल भवनासह इतर काही महत्वाच्या ठिकाणांची रेकी (टेहळणी) केल्याचा खुलासा या दहशतवाद्याने केला. (Jaish-e-Mohammed terrorist reveals pakistan plan to target nsa ajit doval)
डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातीलदहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये डोवालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत. यासंदर्भात संरक्षण संस्था आणि केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे.
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिकच्या चौकशीतून त्याने डोवाल यांच्या कार्यालयाचा व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हिदायत-उल्लाह हा मुळचा शोपियनचा रहिवासी आहे. त्याला सहा फेब्रुवारीला अनंतनागमधून अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा सापडला होता. जम्मूतील गानग्याल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात UAPAअंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तो जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख आहे.
2019 मध्ये तयार करण्यात आला होता डोवालांच्या कार्यालयाचा व्हिडिओ -
हिदायत-उल्लाह 24 मे 2019 रोजी विमानाने श्रीनगरहून-दिल्लीला आला. होता येथे त्याने NSA कार्यालयाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ त्याने पाकिस्तानी हँडलर्सना पाठविल्याची माहिती दिली. यावेळी त्याने डोवालांच्या कार्यालयाशिवाय इतर ठिकाणांचीही रेकी केली होती. नंतर तो काश्मीरला परतला होता. त्याने 2019 मध्येच सांबा सेक्टरचीही पाहणी केली होती. यावेळी समीर अहमद डारही त्याच्यासोबत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. डारला पुलवामा हल्ल्याप्रकरणी 21 जानेवारी 2020 रोजी अटक करण्यात आली आहे.