एअर स्ट्राइकमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानने नाकारले, पण 'जैश'ने केले मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:34 AM2019-03-03T11:34:34+5:302019-03-03T11:43:04+5:30
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तान सरकार आणि लष्काराने कोणतेही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. मात्र, 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेने खुद्द नुकसान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तान सरकार आणि लष्काराने कोणतेही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. मात्र, 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेने खुद्द नुकसान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
'जैश-ए-मोहम्मद' या संघटनेचे प्रमुख मसूद अजहर याचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. सोशल मीडियावर मौलाना अम्मार याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मौल्लाना अम्मार याने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमधील तळ उद्धवस्त केल्याचे म्हटले आहे. तसेच, 'मर्काज' (धार्मिक शिक्षा केंद्र) वर बॉम्ब फेकल्याचे सांगितले असून त्याने याबाबत नाराजी व्यक्त करत शत्रूंनी युद्ध पुकारले आहे, असे भारतीय हवाई दलाच्या कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानमधील पेशावरमधील एका जनसभेला संबोधित करताना म्हटले आहे. याचबरोबर, भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य केले नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. काश्मीरमधील मुस्लिमांच्या मदतीसाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला आहे, असेही मौलामा अम्मार याने म्हटले आहे.
दुसरीकडे, भारतीय गुप्तहेर यंत्रणांकडे एसएआरच्या मदतीने टिपलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये भारतीय हवाई दलाकडून लक्ष्य करण्यात आलेल्या चार इमारती पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर पाकिस्ताननेही हल्ला झाल्याची कबुली दिली होती. मात्र बालाकोट येथे ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे दहशतवाद्यांचे तळ असल्याचे वा त्यात कुणाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले नाही.
दरम्यान, 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.