एनएसजी पाठिंब्यासाठी जयशंकर यांनी केला चीन दौरा
By admin | Published: June 19, 2016 11:35 AM2016-06-19T11:35:27+5:302016-06-19T11:37:47+5:30
एनएसजी देशांच्या संघटनेत भारताच्या समावेशाला चीनने पाठिंबा द्यावा यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर तीन दिवसांपूर्वी चीनला जाऊन आले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - अणवस्त्र तंत्रज्ञानावर नियंत्रण करणा-या एनएसजी देशांच्या संघटनेत भारताच्या समावेशाला चीनने पाठिंबा द्यावा यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर तीन दिवसांपूर्वी चीनला जाऊन आले. चीनने विरोधाची भूमिका सोडून भारताला पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी चीनी अधिक-यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण कोरिया सेऊल येथे एनएसजी देशांची बैठक होणार आहे. या बैठकीत भारताच्या प्रवेशावर अंतिम निर्णय होणार आहे. बैठकीपूर्वी भारत सरकार एनएसजी समूहातील सर्व देशांचे एकमत घडवून आणण्यासाठी पडद्यामागून जोरदार कुटनितीक प्रयत्न करत आहे. ४८ देशांच्या एनएसजी समूहामध्ये भारताच्या प्रवेशाला चीनने विरोध केला आहे.
भारताचा समावेश करणार असाल तर, पाकिस्तानलाही स्थान द्या अशी भूमिका चीनने घेतली आहे. १६-१७ जून रोजी व्दिपक्षीय चर्चेसाठी परराष्ट्र सचिव चीनमध्ये होते अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली आहे. सर्व महत्वाच्या मुद्यांसह भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबद्दलही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
या गटात समावेश झाल्यास भारताला अन्य सदस्य देशांकडून अणूऊर्जा तंत्रज्ञान सहजतेने मिळेल तसेच भारतालाही आपले अणूऊर्जा तंत्रज्ञान दुस-यांना देता येईल. जागतिक अणूऊर्जा व्यापराचे नियंत्रण करणा-या एनएसजी देशांची सेऊलमध्ये २३ आणि २४ जूनला महत्वाची बैठक होईल. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा विचार करण्यात येईल.