जेटलींनी केजरीवालांना माफ केलं, मागे घेणार मानहानीचा खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 04:18 PM2018-04-02T16:18:08+5:302018-04-02T16:18:08+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. त्यामुळे आता अरुण जेटलीही मानहानीचा खटला मागे घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी(आप)चे नेते संजय सिंह आणि आशुतोष या तिघांनी एक पत्र जेटलींना पाठवून त्यांची माफी मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अरुण जेटलींनी केजरीवालांच्या माफीचा स्वीकार केला आहे. ते लवकरच खटला मागे घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी नितीन गडकरी व कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून त्यांचीसुद्धा माफी मागितली होती. दोन्ही नेत्यांनी सहमतीने केस बंद करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर नितीन गडकरींनी पटियाला हाऊस कोर्टातील मानहानीचा खटला मागे घेतला होता.
Delhi CM Arvind Kejriwal, AAP leaders Sanjay Singh,Ashutosh and Raghav Chadha apologize to Union Finance Minister Arun Jaitley in the defamation case he had filed against them pic.twitter.com/CJFqxVD738
— ANI (@ANI) April 2, 2018
माझ्याकडून काहीही पुराव्यांशिवाय तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे तुमची बदनामी झाली हे मी जाणतो. त्याचमुळे तुम्ही माझ्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. मी केलेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो आहे. मी त्यासाठी तुमची माफी मागतो. माझी विनंती आहे की माझ्या विरोधातला अब्रू नुकसानीचा खटला आपण मागे घ्यावा, अशी विनंती केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.