दिल्ली क्रिकेट घोटाळ्यात जेटली-केजरी यांच्यात जुंपली
By admin | Published: December 21, 2015 02:27 AM2015-12-21T02:27:31+5:302015-12-21T02:27:31+5:30
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित घोटाळ्यावरून या संघटनेचे माजी अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात रविवारी चांगलीच जुंपली.
नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित घोटाळ्यावरून या संघटनेचे माजी अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात रविवारी चांगलीच जुंपली. बेजबाबदार आणि निखालस खोटे आरोप केल्याबद्दल केजरीवाल व आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांवर बदनामीचे फौजदारी व दिवाणी खटले दाखल करण्याचे जेटली यांनी टिष्ट्वटरवरून जाहीर केले. दुसरीकडे केजरीवाल यांनी या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ गोपाळ सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याचे ठरविले.
राजकीय आखाड्यात सुरू झालेल्या या वादात क्रिकेटपटूही उतरले. भाजपा खासदार व माजी कसोटीपटू कीर्ती आझाद यांनी एक पत्रपरिषद घेऊन जेटलींना थेट न गुंतविता दिल्ली क्रिकेट संघटनेतील ८७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ‘भंडाफोड’ केला. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग व इशांत शर्मा यांनी टिष्ट्वटरवरून जेटलींची पाठराखण केली व दिल्लीच्या क्रिकेटमध्ये जे काही चांगले झाले ते जेटलींमुळेच झाले, अशी भलामण त्यांनी केली.
केजरीवाल यांच्याखेरीज कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चड्ढा व दीपक बाजपेयी या ‘आप’च्या नेत्यांविरुद्ध खटले दाखल करण्यास आपण वकिलांच्या चमूला सांगितले आहे. हे खटले आपण केंद्रीय मंत्री म्हणून नव्हे, तर व्यक्तिगत स्वरूपात दाखल करणार आहोत.
- अरुण जेटली, टिष्ट्वटरवर