जेटली-जेठमलानी यांच्यात खडाजंगी
By admin | Published: May 18, 2017 04:29 AM2017-05-18T04:29:48+5:302017-05-18T04:29:48+5:30
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि राम जेठमलानी या दोन मुरब्बी वकिलांमध्ये बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात जोरदार शाब्दिक खडाजंगी
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि राम जेठमलानी या दोन मुरब्बी वकिलांमध्ये बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध जेटली यांनी दाखल केलेल्या १० कोटींच्या बदनामी दाव्यात, केजरीवाल यांचे वकील या नात्याने जेटलींची उलटतपासणी घेताना, जेठमलानी यांनी एक ठरावीक शब्द वापरण्यावरून दोघांमध्ये ही तणातणी झाली.
जेटली यांची उलटतपासणी नोंदविण्याचे काम न्यायालयाच्या सहनिबंधक दीपाली शर्मा यांच्यासमोर सुरू होते. जेटमलानी प्रश्न विचारण्याच्या नावाखाली आपली बदनामी करत आहेत, हे पाहून जेटली यांचा संयम सुटला व त्यांनी जेठमलानींच्या ठरावीक शब्द वापरण्यावर आक्षेप घेतला. तरीही जेठमलानी यांनी तोच पवित्रा कायम ठेवल्यावर, निबंधक शर्मा यांनी वकिलांना मर्यादा न सोडण्याची समज दिली. नंतर केजरीवाल यांच्या बाजूनेच विनंती करण्यात आल्याने, पुढील कामकाज २८ व ३१ जुलै रोजी ठेवण्यात आले.
उलटतपासणीच्या दरम्यान एका टप्प्याला शब्दावरून शब्द वाढत गेला आणि ‘जेटली आपल्या मनातील गुन्हेगारीची भावना दडवून लोकांना फसवीत आहेत,’ असे जेठमलानी म्हणाले. यावर जेटली यांनी आक्षेप घेतला व तुम्ही ही भाषा तुमचे अशील केजरीवाल यांच्या सांगण्यावरून वापरत आहात का, असे विचारले. तसे असेल, तर आपण बदनामीचा आणखी गंभीर आरोप ठेवू, असे जेटली म्हणाले.
लढाईला आले नवे स्वरूप
न्यायालयातील ही लढाई अरुण जेटली वि. अरविंद केजरीवाल अशी आहे, राम जेठमलानी वि. अरुण जेटली अशी नाही, याचाही जाणीव राजीव नायर आणि संदीप सेठी या जेटलींच्या ज्येष्ठ वकिलांनी जेठमलानी यांना करून दिली. यावर, केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच आपण हा शब्द वापरत असल्याचे जेठमलानी म्हणाले. मात्र, सुरुवातीपासून या दाव्यात केजरीवाल यांच्या वतीने काम पाहणारे वकील अनुपम श्रीवास्तव यांनी केजरीवाल यांनी असे काही सांगितलेले नाही, असे सांगून जेठमलानी यांना खोटे पाडले.