चीनचा दौरा अर्धवट सोडून जेटली भारतात
By admin | Published: June 28, 2016 05:56 AM2016-06-28T05:56:05+5:302016-06-28T05:56:05+5:30
चीनचा पाच दिवसांचा दौरा अर्धवट सोडून अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी रात्री भारतात परतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवी दिल्ली : चीनचा पाच दिवसांचा दौरा अर्धवट सोडून अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी रात्री भारतात परतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि जेटली यांच्यावर केलेल्या टीकेमुळेच ते दौरा अर्धवट सोडून परत आल्याचे बोलले जात आहे. जेटली चीनच्या दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी विदेशात टाय-सूट घालू नये. तशा पेहरावात ते
वेटरसारखे दिसतात, असे स्वामी म्हणाले होते. त्यामुळे स्वामी यांच्यावर लगाम लावावा, अशी मागणी जेटली यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे.
जेटलींचा नियोजित दौरा अचानक का बदलला? याबाबत अधिकाऱ्यांनी भाष्य केले नाही, पण मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम आणि अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या टीकेमुळे जेटली नाराज आहेत.
२४ जून रोजी जेटली चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. एआयआयबीच्या (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँक) बैठकीसाठी ते चीनला गेले होते.
चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई यांच्याशी ते सोमवारी चर्चा करणार होते, पण ही बैठक रविवारीच
झाली. त्यांच्या अन्य कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे प्रमुख शू शाओशी आणि पीपल्स बँक आॅफ चायनाचे गव्हर्नर झू शियाओचियान यांच्याशी ते चर्चा करणार होते, पण तत्पूर्वीच
अरुण जेटली देशात परत
आल्याने तर्कवितर्क केले जात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)