जेटलींचा १० कोटींचा दावा; केजरींचाही पलटवार
By admin | Published: December 22, 2015 03:09 AM2015-12-22T03:09:19+5:302015-12-22T03:09:31+5:30
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराशी निगडित आरोपांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात सुरू झालेल्या राजकीय संघर्षाला कायदेशीर लढाईचा नवा आयाम मिळाला.
नवी दिल्ली : दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचाराशी निगडित आरोपांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात सुरू झालेल्या राजकीय संघर्षाला सोमवारी कायदेशीर लढाईचा नवा आयाम मिळाला. जेटली यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य पाच नेत्यांविरुद्ध पतियाळा हाऊस कोर्टात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा दिवाणी खटला दाखल केला आहे. तसेच सायंकाळी उशिरा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जेटलींचा उघडपणे बचाव केला.
केजरीवाल यांनी असल्या खटल्यांना आपण घाबरत नसल्याचे जाहीर तर केलेच शिवाय दिल्ली सरकारच्या बैठकीत या भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग नियुक्त केला. चर्चेसाठी दिल्ली विधानसभेचे मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.