संसदेत जेटली विरूद्ध काँग्रेस जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 02:53 PM2017-08-02T14:53:41+5:302017-08-02T14:55:10+5:30

कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याचे पडसाद बुधवारी संसदेत उमटले.

Jaitley in Jundal in Parliament | संसदेत जेटली विरूद्ध काँग्रेस जुंपली

संसदेत जेटली विरूद्ध काँग्रेस जुंपली

Next
ठळक मुद्दे-कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याचे पडसाद बुधवारी संसदेत उमटले.काँग्रेसने संसदेच्या दोन्हीही सभागृहात या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ केला. राजकीय वैमनस्यातून हे छापे टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला.

नवी दिल्ली, दि. 2- कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याचे पडसाद बुधवारी संसदेत उमटले. काँग्रेसने संसदेच्या दोन्हीही सभागृहात या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ केला. राजकीय वैमनस्यातून हे छापे टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला. गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना घाबरविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली, असा आरोप काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केला.फक्त एका राज्यसभा उमेदवाराला हरविण्यासाठी संपूर्ण खटाटोप केला जातो आहे. पण यामध्ये भाजपला यश मिळत नसल्याचं खरगे म्हणाले. खरगे यांच्या या आरोपवर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर दिलं.

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सरकारी पक्षाची बाजू सांभाळली. आयकर विभागाचे छापे सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार रिसॉर्टमध्ये जाऊन लपले, असं अर्थमंत्री अरूण जेटली लोकसभेत म्हणाले. म्हणूनच त्या आमदारांची चौकशी करायला आयकर विभागाचे अधिकारी रिसॉर्टवर गेले होते. रिसॉर्टवर कोणताही छापा टाकण्यात आला नाही तसंच कोणत्याही आमदाराची तपासणी झाली नसल्याचं अरूण जेटली म्हणाले आहेत. जेटली यांच्या माहितीनुसार, जेव्हा आयकर विभागाचे अधिकारी रिसॉर्टवर पोहचले तेव्हा तिथे काही कागदपत्रं फाडली जात होती. त्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. आयकर विभागाच्या या कारवाईला गुजरातच्या निवडणुकांशी तसंच राजकारणाशी न जोडता आर्थिक गोष्टींमुळे झालेली कारवाई, अशा दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे, असं मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मांडलं. 

राज्यसभेत काय घडलं?

राज्यसभेत गदारोळ करणाऱ्या खासदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. 'लोकशाहीची हत्या बंद करा', 'सरकारी हुकुशहापद्धत नाही चालणार' अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यसभेचं कामकाम सुरू होताच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मुद्दा उपस्थित केला. सरकारी यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोध दडपणं ही नवी पद्धत सुरू झाल्याचं आनंद शर्मा म्हणाले. आयटी, सीबीआय़ आणि ईडीसारख्या सरकारी यंत्रणा वापरून विरोधी पक्षांना घाबरवायचे प्रयत्न सुरू असल्याचंही  शर्मा म्हणाले. बुधवारी आयकर विभागाने ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे त्यांना टार्गेट करण्याचा प्रकार असल्याचं आनंद शर्मा म्हणाले. जी व्यक्ती काँग्रेस पक्षासाठी काम करेल त्यांना असंच टार्गेट केलं जाइल, हा मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या कारवाईतून झाल्याचंही ते म्हणाले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. गुजरात राज्यसभेची निवडणूक फ्री, फेअर आणि भयमुक्त व्हायला हवी. पण या गोष्टी होत नाही.भीतीचं वातावरण पश्चिम भागात होतं पण आता ते दक्षिणेकडे पोहचलं आहे, असं आजाद म्हणाले. काँग्रेसच्या मतानुसार, पश्चिम गुजरातमध्ये आमदारांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. आता हाच प्रकार दक्षिणेत होतो आहे. आयकर विभागाची ही कारवाई पक्षावर नसून फक्त एका व्यक्तीवर असल्याचं सरकारचं म्हणणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. 

जेटलींनी केला बचाव
काँग्रेसने केलेले सगळे आरोप अर्थमंत्री अरूण जेटली यांनी फेटाळून लावले. रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला नाही, तेथे असलेल्या आमदारांची तपासणीही झाली नाही, असं जेटली म्हणाले. एकुण 39 ठिकाणांवर छापेमारी झाली, असं अरूण जेटली म्हणाले आहेत. 

Web Title: Jaitley in Jundal in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.