जेटली ‘नॉट आउट’!
By admin | Published: December 28, 2015 04:28 AM2015-12-28T04:28:32+5:302015-12-28T04:28:32+5:30
डीडीसीए कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जेटली यांना लक्ष्य केले असतानाच डीडीसीएसंदर्भातील नेमलल्या चौकशी समितीच्या अहवालात जेटलींचा नामोल्लेखही करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे
नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघातील (डीडीसीए) कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले असतानाच डीडीसीएसंदर्भातील दिल्ली सरकारने नेमलल्या चौकशी समितीच्या अहवालात जेटलींचा नामोल्लेखही करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
दक्षता विभागाचे प्रधान सचिव चेतन सांघी यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीने आपल्या २३७ पानांच्या अहवालात जेटलींच्या नावाचा उल्लेख न करता डीडीसीएच्या गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे. डीडीसीएवरील मोठ्या प्रमाणातील आरोप पाहता बीसीसीआयने या क्रिकेट संस्थेला त्वरित निलंबित करायला हवे, असेही अहवालात म्हटले आहे. डीडीसीएवर यासंदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याबद्दल बीसीसीआयलाही समितीने आडव्या हाताने घेतले आहे. दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून न्या. लोढा समितीला दिल्ली क्रिकेट संघटनेच्या कारभाराची घडी नीट बसविण्याच्या शिफारशी करण्याची विनंती करावी, असे समितीने म्हटले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्ली क्रिकेट संघटनेच्या कारभारातील अनेक गैरव्यवहारांचे समितीने सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यात संबंधित प्राधिकाऱ्यांची पूर्वसंमती न घेता स्टेडियममध्ये खासगी कंपन्यांसाठी ‘कॉर्पोरेट बॉक्सेस’ बांधणे व खेळाडूंना वय पडताळणी प्रमाणपत्रे देताना हेराफेरी केल्याचा समावेश आहे. परंतु यात जेटली यांचा नावाने किंवा पदनामानेही उल्लेख नाही.
1999-2013 या काळात जेटली डीडीसीएचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात डीडीसीएत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. याउलट जेटलींनी स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
केजरीवाल, माफी मागा !भाजपाची मागणी
दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघातील (डीडीसीए) कथित गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या समितीच्या अहवालात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेटलींची माफी मागावी, अशी मागणी भाजपाने रविवारी केली.
काँग्रेस शासनकाळातील चौकशीतही जेटली निष्कलंक सिद्ध झाले होते. आता आम आदमी पार्टीच्या सरकारने केलेल्या तपासातही जेटलींवरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. डीडीसीए गैरव्यवहारासंदर्भात जेटलींवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या केजरीवालांनी माफी मागायला हवी, असे भाजपा प्रवक्ते एम.जे. अकबर म्हणाले.
अकबर म्हणाले
की, सीबीआयने मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयावर धाड टाकली तेव्हा डीडीसीएसंबंधी जेटलींविषयीची फाईल हस्तगत करण्यासाठी
ती धाड घातली गेली,
असा कांगावा केजरीवाल यांनी केला. ते ज्या फाईलबद्दल बोलत होते ती याच अहवालाची फाईल होती. त्यात जेटलींचे नावही नसल्याने सत्य जगासमोर आले आहे.