जेटली - स्वामी संघर्षाची ठिणगी
By admin | Published: June 24, 2016 04:54 AM2016-06-24T04:54:37+5:302016-06-24T04:54:37+5:30
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्यावरील सुब्रमण्यम स्वामी यांच्या टीकेला महत्त्व न देण्याचा निर्णय मोदी सरकार व भाजपाने घेतल्यानंतर स्वामी यांनी वित्त सचिव शक्तिकांत
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्यावरील सुब्रमण्यम स्वामी यांच्या टीकेला महत्त्व न देण्याचा निर्णय मोदी सरकार व भाजपाने घेतल्यानंतर स्वामी यांनी वित्त सचिव शक्तिकांत दास यांना लक्ष्य केले आहे.
दास यांच्याविरुद्ध महाबलीपुरम येथील स्थावर मालमत्ता हडप करणारे पी. चिदंबरम यांना मदत केल्याचा आरोप अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप स्वामींनी केला. दास यांनी भरपूर देशसेवा केली असल्याने त्यांना आता त्यांच्या तामिळनाडू राज्यात पाठवावे, असेही स्वामी म्हणाले.
आधी रघुराम राजन, नंतर अरविंद सुब्रमण्यन यांना लक्ष्य केल्यानंतर दास यांच्यावर टीकास्त्र चढवण्यामागे स्वामी यांचे काही हितसंबंध आहेत की काय, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी ज्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे, त्यांच्यावरच स्वामी हल्ला चढवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुब्रमण्यन यांच्याविरुद्धची टीका बंद करून अरुण जेटली यांच्या विश्वासातील दास यांना लक्ष्य बनवून स्वामी यांनी वाद धगधगत ठेवला आहे. त्यामुळे स्वामी यांचे खरे टार्गेट जेटलीच आहेत, या काँग्रेसच्या आरोपाला पुष्टी मिळत आहेत.