‘जेटलीही निष्कलंक ठरतील’
By Admin | Published: December 23, 2015 02:25 AM2015-12-23T02:25:58+5:302015-12-23T10:00:52+5:30
दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) प्रकरणी अर्थमंत्री अरूण जेटलींवर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहेत. जैन हवाला प्रकरणात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ज्याप्रकारे निष्कलंक ठरले
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) प्रकरणी अर्थमंत्री अरूण जेटलींवर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहेत. जैन हवाला प्रकरणात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ज्याप्रकारे निष्कलंक ठरले त्याचप्रमाणे डीडीसीए घोटाळ्याच्या तथाकथित आरोपातून जेटली देखील निर्दाेष ठरतील. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष ठामपणे जेटलींच्या पाठिशी उभा आहे, असे आश्वासक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा संसदीय पक्षाच्या मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत काढले.
मुख्यमंत्री केजरीवाल व ‘आप’ ने अर्थमंत्री जेटलींवर केलेल्या आरोपांच्या भडिमारानंतर तब्बल ६ दिवसांनी पंतप्रधान मोदींनी या विषयावर आपले मौन सोडले.
तथापि जेटलींचा बचाव करतांना अडवाणींचा उल्लेख ज्याप्रकारे मोदींनी केला, त्यातून अनेक नवे प्रश्न जन्माला आले. संसद भवनात काँग्रेसच्या वार्तालापात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद प्रश्न उपस्थित करीत म्हणाले, जैन हवाला प्रकरणी आरोप झाल्याबरोबर अडवाणींनी संसद सदस्यत्वाचा लगेच राजीनामा दिला होता. इतकेच नव्हे तर सदर प्रकरणी निष्कलंक ठरेपर्यंत ना त्यांनी निवडणूक लढवली ना संसदेत पाय ठेवला. जेटलींना त्याच प्रयोगाचे अनुकरण करायला तर पंतप्रधान सुचवीत नसावेत? पक्षातल्या तमाम असंतुष्टांसाठी अडवाणींचे उदाहरण हा संकेत तर नाही? ‘आप’ नेते आशिष खेतान यांनीही याच आशयाचे व्टीट केले आहे.