ईपीएफवरील कराचा मुद्दा सोडवू - जेटली
By admin | Published: March 3, 2016 04:20 AM2016-03-03T04:20:59+5:302016-03-03T04:20:59+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) कर लावण्याच्या प्रस्तावाशी संबंधित असलेला मुद्दा याच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान चर्चेमधून निकालात काढला जाईल
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) कर लावण्याच्या प्रस्तावाशी संबंधित असलेला मुद्दा याच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान चर्चेमधून निकालात काढला जाईल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ईपीएफवर कर आकारण्याच्या मुद्यावर जेटली यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे सदस्य सौगत राय यांनी केल्यानंतर जेटली यांनी या मुद्यावर फेरविचार सुरू आहे आणि संसदेत चर्चेदरम्यान त्यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले.
ईपीएफवर कर आकारण्याच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावामुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे, असे तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय म्हणाले. जेटली यांनी याआधी सकाळी उद्योग संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीतही हा मुद्दा सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना या मुद्यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे ते महणाले होते. (वृत्तसंस्था)