जेईईमध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय पहिला; पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 03:29 AM2019-06-15T03:29:03+5:302019-06-15T03:29:43+5:30
पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण
एस. के गुप्ता
नवी दिल्ली : आयआयटीमधील १ लाख १२ हजार २७९ जागांसाठी झालेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता ३४६ गुण मिळवून पहिला आला. दहा गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील शबनम सहाय मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. प्रवेशासाठीच्या कौन्सिलिंगचे वेळापत्रक दोन दिवसांनी जाहीर केले जाईल. परीक्षेला १,६१,३१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार ७०५ उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ३३ हजार ३४९ मुले व ५,३५६ मुली आहेत. गुणवंतामध्ये कार्तिकेयबरोबरच कौस्तुभ दिघे, शबनम सहाय आहेत.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, नवभारताच्या निर्माणामध्ये हे सर्व विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भविष्यात आणखी संधी नक्कीच चालून येतील.
हे आहेत टॉपर
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मुंबई विभागाबरोबरच दिल्लीनेही चांगले यश मिळविले आहे.
या परीक्षेत सामान्य वर्गामधील १५,५६६, ओबीसी-नॉन क्रिमी लेयर श्रेणीतील ७,६५१, अनुसूचित जातीमधील ८,७५८, अनुसूचित जमातीतील ३,०९४ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.
देशातील १० टॉपरमध्ये हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी
(हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.