जेटलींना नडणारा न्यायाधीश निलंबित
By admin | Published: February 15, 2016 03:43 AM2016-02-15T03:43:27+5:302016-02-15T03:43:27+5:30
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा कायदा रद्दबातल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केल्याबद्दल केंद्रीय अरुण जेटली यांच्याविरुद्ध स्वत:हून देशद्रोहाच्या खटल्याची कारवाई सुरू
अलाहाबाद : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा कायदा रद्दबातल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केल्याबद्दल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध स्वत:हून देशद्रोहाच्या खटल्याची कारवाई सुरू करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दिवाणी न्यायाधीशास निलंबित करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका करणारा ‘इंडियन डेमॉक्रसी कॅनॉट बी ए टायरनी आॅफ दी अनइलेक्टेड’ हा ब्लॉग जेटली यांनी लिहिला होता. याबद्दल जेटली यांच्याविरुद्ध भादंवी कलम १२४ ए (देशद्रोह) व कलम ५०५ (सार्वजनिक उपद्रव) अन्वये खटल्याचे समन्स झांशी जिल्ह्यातील महोबा येथील एक दिवाणी न्यायाधीश अंकित गोयल यांनी जारी केले होते. या गोयल यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने, अनियमितता व अधिकार सोडून काम करणे, यासाठी निलंबित केले. बलात्काराचे आरोप बऱ्याचवेळा कपोलकल्पितही असू शकतात, या मुलायम सिंग यादव यांच्या कथित विधानाबद्दल गोयल यांनी यादव यांच्यावरही समन्स जारी केले होते. उच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करून ही दोन्ही प्रकरणे रद्द केली होती.