जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

By admin | Published: February 14, 2016 03:40 AM2016-02-14T03:40:25+5:302016-02-14T03:40:25+5:30

मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे

Jaitley's reversal of Manmohan Singh | जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे धोरणात्मक पंगुतेपासून जागतिक स्तरावर अत्युच्च शिखर गाठण्याचा आहे, असे प्रतिपादन करतानाच वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर काँग्रेसची भूमिका राजकारणाने प्रेरित आणि दुटप्पी असल्याचा आरोप जेटली यांनी केला.
जेटली यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या पक्षाला काय सल्ला दिला पाहिजे’ या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, संपुआ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस मुख्यालय, २४ अकबर रोडवर धोरण निर्मिती होत असे. याउलट रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असतो.
माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फार क्वचित बोलतात. परंतु जेव्हा ते आपले मनोगत मांडतात तेव्हा देश गांभीर्याने त्यांचे म्हणणे ऐकत असतो. ते देशाच्या समजूतदारपणाचे, विवेकाचे प्रतिनिधित्व करीत असतात याकडे लक्ष वेधताना माजी पंतप्रधानांनी निष्पक्ष राहून विधायक सल्ला दिला पाहिजे, असे मत जेटली यांनी मांडले. सोबतच कधीकधी त्यांनी आपल्या राजकीय पक्षालासुद्धा राष्ट्रहितासाठी ठोस काम करण्याचा संदेश दिला पाहिजे, अशी कोपरखळी मारली.
आपण डॉ. सिंग यांचा आदर करीत असून त्यांच्याकडूनही आपल्याला अशाच आदराची अपेक्षा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
सिंग यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन जेटली म्हणाले की, मनमोहनसिंग यांनी निष्पक्षपणे विद्यमान सरकारची मीमांसा केल्यास भारतात असे सरकार आहे ज्यात अंतिम निर्णय पंतप्रधानांचा असतो आणि नैसर्गिक स्रोतांचे वाटप कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय पारदर्शक प्रक्रियेद्वारे केले जाते याची जाणीव त्यांना निश्चित होईल.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट असल्याने अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वांत कमकुवत सरकार आहे, अशा शब्दांत मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्याला जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Jaitley's reversal of Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.