मदुराईमध्ये आज जलीकट्टू
By admin | Published: January 22, 2017 12:35 AM2017-01-22T00:35:47+5:302017-01-22T00:35:47+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी जलीकट्टू खेळासाठीच्या वटहुकुमावर स्वाक्षरी केल्याने संपूर्ण तामिळनाडूमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चेन्नई/मदुराई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी जलीकट्टू खेळासाठीच्या वटहुकुमावर स्वाक्षरी केल्याने संपूर्ण तामिळनाडूमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मदुराईच्या जिल्हा प्रशासनानेही रविवारी जलीकट्टू या बैलांच्या खेळाला या वटहुकुमाच्या आधारे परवानगी दिली असून, जिल्ह्याच्या अलंगनल्लूर या गावी हे खेळ होणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम तिथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सध्या तामिळनाडूचीही सूत्रे आहेत. जलीकट्टूला संमती देणाऱ्या वटहुकुमावर स्वाक्षरी करण्यासाठी ते आज दुपारी खास मुंबईहून चेन्नईला आले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी लगेचच
त्यावर सह्या केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. केंद्र सरकारने याआधीच जलीकट्टूसाठी वटहुकूम काढण्यास हिरवा कंदिल दाखवला होता.
अर्थात यंदा हा खेळ होणार असला तरी हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे. रविवारी जलीकट्टू होईल.
मात्र तो कायमस्वरूपी होणार का,
हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. वटहुकुमाची
मुदत सहा महिने असते. त्यावर तामिळनाडू विधानसभेते सहा महिन्यांच्या आत शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)