Jallianwala Bagh massacre:: ब्रिटिश राजवटीच्या अंताला प्रारंभ, १०२ वा स्मतिदिन; ब्रिटिशांनी केली होती फक्त ३७९ मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:43 AM2021-04-14T00:43:15+5:302021-04-14T07:15:55+5:30
Jallianwala Bagh massacre: १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या.
अमृतसर : जालियानवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल रोजी १०२ वर्षे झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या या नरसंहारात हजारो लोक मारले गेले, तरी ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमध्ये फक्त ३७९ जणांच्या हत्येची व १२०० लोक जखमी झाल्याची नोंद केली गेली. हा नरसंहार ब्रिटिश भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
१३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या.
हे हत्याकांड झाले तो दिवस बैसाखी होती. या नरसंहारानंतर ब्रिटिश राजवटीच्या शेवटास सुरुवात
झाली. नंतर देशाला उधम
सिंहसारखा क्रांतिकारी मिळाला आणि भगत सिंग यांच्यासह अनेक युवकांच्या हृदयात देशभक्तीची
लाट निर्माण झाली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यातूनच देशातील अनेक क्रांतीकारी तरुण ब्रिटीश राजवटीविरुद्ध एकवटले.
१० मिनिटे गोळीबार केला, १६५० फैरी झाडल्या...
जालियानवाला बाग प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून दीड किलोमीटरवर आहे. १३ एप्रिल रोजी रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभा सुरू होती. या बागेत अनेक वर्षांपासून बैसाखीच्या दिवशी मेळाही व्हायचा. त्यात भाग घेण्यासाठी त्या दिवशी शेकडो लोक आले होते.
जनरल डायर ९० सैनिकांसह तेथे आले व त्यांनी बागेला घेराव घालून कोणताही इशारा न देता नि:शस्त्र जमावावर गोळीबार सुरू केला. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता व सैनिकांनी तो अडवून ठेवला होता. त्यामुळे अनेकांचा जीव गेला.
डायर यांच्या आदेशावर ब्रिटिश लष्कराने न थांबता १० मिनिटे गोळीबार केला. १६५० फैरी झाडल्या गेल्या. गोळ्या संपल्यानंतरच तो थांबला, असे सांगितले जाते.
अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीला हुतात्मा विहीर म्हटले जाते. विहिरीत १२० मृतदेह सापडले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माहितीनुसार एक हजारांपेक्षा जास्त लोक हुतात्मा झाले व १५०० पेक्षा जास्त जखमी झाले.
जनरल डायर रॉलेट कायद्याचे कट्टर समर्थक होते म्हणून त्यांना त्याला विरोध मान्य नव्हता. त्यांचा समज होता की, या नरसंहारानंतर भारतीय घाबरून जातील; परंतु ब्रिटिश सरकारविरोधात पूर्ण देशात आंदोलन निर्माण झाले.