जल्लीकट्टूबाबतची याचिका फेटाळली
By admin | Published: January 13, 2017 01:01 AM2017-01-13T01:01:55+5:302017-01-13T01:01:55+5:30
तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टूला परवानगी देण्याबाबतच्या याचिकेवरील
नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टूला परवानगी देण्याबाबतच्या याचिकेवरील निर्णय लगेच द्यावा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे.
शनिवारी पोंगल सण असून, त्या आधी न्यायालयाने निर्णय द्यावा आणि जल्लीकट्टूबाबतची भूमिका स्पष्ट होईल, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने दोन दिवस आधी निर्णय देण्यास नकार दिला. शनिवारच्या आधी आम्ही निर्णय वाचून दाखवू, असे न्यायालयाने सांगितले. दोन दिवस आधी खंडपीठाकडे निर्णय देण्याची मागणी करणे अयोग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. ‘याबाबतच्या निकालाचा मसुदा तयार करण्यात आला असून, शनिवारआधी निर्णय देणे शक्य नाही,’ असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
तामिळनाडू सरकारसह अण्णाद्रमुक, तसेच द्रमुक आणि अन्य सर्व राजकीय पक्ष, तसेच अन्य संघटनांनी जल्लीकट्टूला परवानगी मिळावी आणि त्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने जल्लीकट्टूवर बंदी घातल्याने, केंद्रानेच हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्य सरकारनेही केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनावरांवरील क्रूरता लक्षात घेता, २0१४ साली न्यायालयाने जल्लीकट्टूवर बंदी घातली होती.
मात्र, या निर्णयाला तामिळनाडूमधील राजकीय पक्षांनी विरोध केला होता.