Jamia Protest: शाहीन बाग, खेल खत्म; त्यानं फेसबुकवर दिले होते गोळीबाराचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 08:00 PM2020-01-30T20:00:20+5:302020-01-30T20:05:08+5:30
गोळीबारात एक व्यक्ती जखमी; उपचार सुरू
नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर आज एका व्यक्तीनं गोळीबार केला. ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून गोळीबारासारखी कृती करण्याच्या विचारात असल्याचं त्याच्या फेसबुक पेजवरील पोस्टवरुन दिसत आहे. गोळीबार करण्याच्या काही वेळ आधीच त्यानं फेसबुक लाईव्ह केलं होतं. चंदनचा बदला घेण्यासाठी जात असल्याचं त्यानं फेसबुक पेस्टमध्ये म्हटलं होतं. २०१८ मध्ये प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये झालेल्या जातीय संघर्षात चंदन गुप्ताची हत्या झाली होती.
फेसबुकवर स्वत:ला रामभक्त म्हणणाऱ्या व्यक्तीनं आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे. ३१ जानेवारीपर्यंत माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करू नका, अशी एक पोस्ट त्यानं २८ जानेवारीला लिहिली होती. आपण एखादी हिंसक कृती करणार असून त्यात मारलेदेखील जाऊ शकतो, असा अंदाज त्याला होता. त्यामुळेच 'मला अंत्यसंस्काराला नेताना भगवा रंगाच्या कपड्याचा वापर करावा. त्यावेळी जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात याव्यात,' अशी एक पोस्ट त्यानं फेसबुकवर लिहिली होती. याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये शाहीन बाग, खेल खत्म, असंदेखील लिहिलं होतं.
जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करणारा तरुण ग्रेटर नोयडातल्या जेवरचा रहिवासी आहे. तो बारावीचा विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. तो अल्पवयीन असल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे. महाविद्यालयात जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला होता. त्याच्या शाळेच्या दाखल्यावर त्याची जन्मतारीख ८ एप्रिल २००२ अशी आहे.
आज दुपारच्या सुमारास सीएएच्या निषेधार्थ जामिया मिलियाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना एका व्यक्तीनं गोळी झाडली. ही व्यक्ती बाहेरुन आली होती. दिल्ली पोलीस झिंदाबाद, जामिया मिलिया मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत त्यानं गोळी झाडली. यामध्ये जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला. त्याला होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं.