...अन् शेतजमिनीत ७ फूट खाली सापडलं 'लाखोंचं घबाड'; BSF चा निलंबित अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 12:33 PM2021-03-13T12:33:17+5:302021-03-13T12:35:52+5:30
NIA ने दिलेल्या माहितीनुसार, ही धनसंपत्ती आरोपी रोमेश कुमारला ड्रग्स तस्करांनी दिली होती
नवी दिल्ली – जम्मू काश्मीरच्या हंदवाडा नार्को टेररिज्म प्रकरणात तपास करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने(NIA) सांबा जिल्ह्यातून ९१ लाख रुपये जप्त केले आहेत, एनआयएने ही कारवाई सीमा सुरक्षा दलातील(BSF) मधील निलंबित अधिकाऱ्याच्या शेतात केली आहे. सांबा जिल्ह्यातील गुरवालमध्ये असलेल्या शेतजमिनीत ७ फूट खाली पैशांचे घबाड सापडलं आहे, त्यामुळे परिसरातील लोकांसाठी हा चर्चेचा विषय बनला आहे.
NIA ने दिलेल्या माहितीनुसार, ही धनसंपत्ती आरोपी रोमेश कुमारला ड्रग्स तस्करांनी दिली होती, रोमेश कुमार ज्यावेळी नार्को कंट्रोल ब्यूरो(NCB) सोबत काम करत होता, त्यावेळी दहशतवादी कृत्य करणाऱ्या साखळीकडून त्याला ही रक्कम मिळाली, या रक्कमेला रोमेश कुमारने शेतजमिनीत ७ फूट खाली खड्डा करून सुरक्षित ठेवलं होतं, आता सहकारी अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे, अद्याप यातून अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.
रोमेश कुमारची चौकशी करत असताना हा प्रकार समोर आला, तपास अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच ते NIA टीमसोबत शेतात पोहचले, तेथे अलीकडच्या काळात जमीन खोदलेल्याचं दिसून आलं, याच ठिकाणी ७ फूट जमिनीखाली पैसे लपवून ठेवले होते, माहितीनुसार, अटक होण्यापूर्वीच रोमेश कुमारने हे पैसे जमिनीखाली दडवून ठेवले होते, विशेष म्हणजे, NIA ने १ मार्च रोजी श्रीनगर आणि जम्मू येथून ५ आरोपींना अटक करून कोर्टासमोर उभं केले, एनआयएने या आरोपींना १५ दिवसांसाठी रिमांडमध्ये घेतलं, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीवेळी हा प्रकार उघडकीस आला, NIA ने शोधमोहिम हाती घेत शेतजमिनीतून ९१ लाख रुपये जप्त केले.
हंदवाडा नार्को टेरर प्रकरण मागील वर्षी जेव्हा पोलिसांनी अब्दुल मोमिन पीरच्या कारची तपासणी करताना २० लाख रुपये आणि २ किलो हिरोईन जप्त केले होते, NIA ने जून २०२० मध्ये गुन्हा दाखल केला होता, उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, रोमेश कुमार २०१८ पासून ड्रग्स तस्करांसोबत मिळून काम करत होता. NIA ला याची भनक लागली, रोमेश कुमारला २०२० ला जम्मू काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली अटक केली, रोमेश कुमारच्या आधी NIA ने डीएसपी देविंदर सिंह याला दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, देविंदर सिंह यांना याआधीच निलंबित केले आहे.