७ नागरिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा एन्काउंटर; काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:56 PM2024-12-03T16:56:52+5:302024-12-03T17:09:01+5:30
गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
Jammu-Kashmir Dachigam Encounter: मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील दाचीगाम भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. सुरक्षा दलांनी दाचीगामच्या वरच्या भागात सुरू असलेल्या चकमकीत गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा केला. या दहशतवाद्याला ठार केल्यामुळे सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी जुनैद अहमद भट याला चकमकीत ठार मारलं आहे. जुनैद गांदरबल आणि गगनगीरमध्ये नागरिकांच्या हत्येसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. दाचीगामच्या वरच्या भागात पोलिस आणि लष्कराने राबवलेल्या संयुक्त कारवाईत ठार केलं. अजूनही या भागात कारवाई सुरुच आहे.
स्थानिक लष्कर कमांडर जुनैद अहमद भट गगनगीर, गंदरबल आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या हत्यांमध्ये सामील होता. २० ऑक्टोबर रोजी गांदरबलमधील बोगद्याच्या बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगार ठार झाले होते. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर एका सीसीटीव्हीमध्ये भट एका कामगार छावणीत प्रवेश करताना दिसत होता जिथे मजूर आणि इतर कर्मचारी राहत होते. सीसीटीव्हीमध्ये कुलगामचा रहिवासी असलेला भट काळे कपडे आणि तपकिरी शाल गुंडाळलेले, रायफल घेऊन फिरताना दिसत होता.
#OPDachigam : In the ongoing operation, one #terrorist is killed and has been identified as Junaid Ahmed Bhat ( LeT, Category A). The said terrorist was involved in civilians killing at Gagangir, Ganderbal and several other terror attacks. (1/2) https://t.co/zWXLOAtVb5
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 3, 2024
सुरक्षा दलांना दचीगामच्या जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यावर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला पाहून गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या कारवाईने चकमक सुरू झाली. यामध्ये आतापर्यंत जुनैद अहमद भट मारला गेला आहे.
ऑपरेशन दचीगामबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दचीगामच्या वरच्या भागात अजूनही ऑपरेशन सुरू आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने या ऑपरेशनसंदर्भात एक पोस्ट केली आहे. नॉर्दर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी चिनार वॉरियर्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे उत्कृष्ट समन्वय, तत्पर कारवाई आणि ऑपरेशन दचीगममधील ऑपरेशन अचूकपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.