Jammu and Kashmir: BSF कडून तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, 36 किलो ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 10:56 AM2022-02-06T10:56:58+5:302022-02-06T10:57:06+5:30
Jammu Kashmir: 31 जानेवारी रोजी बीएसएफने भारत-पाकिस्तान सागरी सीमेवरुन एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. तसेच तीन मासेमारी नौका जप्त केल्या.
श्रीनगर: सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची घुसखोरी हाणून पाडली आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानचे 3 घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, तेथे तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी तिघांनाही ठार केले. त्यांच्याकडून बीएसएफने 36 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, सुरक्षा दलांनी रात्री शहराच्या जाकुरा भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
एक पाकिस्तानी मच्छीमार ताब्यात
यापूर्वी 31 जानेवारी रोजी बीएसएफने भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालताना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खाडी प्रदेशातून एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले होते. तसेच तीन मासेमारी नौका जप्त करण्यात आल्या. आखाती प्रदेशात बीएसएफच्या गस्ती नौका पाहून सुमारे चार मच्छिमार पाकिस्तानच्या हद्दीत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. बीएसएफने पाकिस्तानी मासेमारी नौकांच्या हालचाली पाहिल्या होत्या, ज्यामध्ये चार-पाच मच्छीमार होते. खवळलेल्या समुद्राच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ते भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.
ड्रोन जागरुकता कार्यक्रम
पाकिस्तानला लागून असलेल्या 198 किमी लांबीच्या सीमेवर राहणारे लोक शेजारील देशाकडून ड्रोन घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी बीएसएफला मदत करत आहेत. सीमा सुरक्षा दल (BSF) ने भारत-पाक सीमेवर ड्रोन संबंधित विविध पैलूंबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 140 हून अधिक ड्रोन जागरुकता कार्यक्रम आयोजित केले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवरील आरएस पुरा, अखनूर आणि अरनिया सेक्टरमधील सीमावर्ती वस्त्यांमध्ये ड्रोन जनजागृती करणारे अनेक फ्लेक्स बोर्डदेखील लावण्यात आले आहेत.