जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:32 PM2024-05-30T17:32:32+5:302024-05-30T18:12:33+5:30

जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

jammu and kashmir bus carrying pilgrims shiv khodi fell into 150 feet deep gorge dead injured | जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी एक भीषण अपघात घडला आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंची बस यूपीमधील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोडीकडे जात होती. यावेळी चोकी चोरा परिसरातील तंगली वळणावर हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचे वाहतूक आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. तसेच, राजिंदर सिंग तारा म्हणाले, "बस शिव खोडीकडे जात होती. इथले वळण अगदी सामान्य आहे. इथे काही अडचण आली नसावी, पण कदाचित ड्रायव्हरला झोप आली असावी. वळण्याऐवजी बस सरळ गेली आणि नंतर खोल दरीत कोसळली."

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. जम्मूमधील अखनूरजवळ झालेल्या बस अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे की, "जम्मू येथील अखनूरमध्ये झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेतील मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो."

Web Title: jammu and kashmir bus carrying pilgrims shiv khodi fell into 150 feet deep gorge dead injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.