जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन

By Admin | Published: January 7, 2016 09:13 AM2016-01-07T09:13:44+5:302016-01-07T14:51:56+5:30

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरूवारी सकाळी दिल्लीतील ' एम्स' रुग्णालयात निधन झाले.

Jammu and Kashmir Chief Minister Mufti Mohammad Sayeed passes away | जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, ७ - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरूवारी सकाळी दिल्लीतील ' एम्स' रुग्णालयात निधन झाले. श्वसनास त्रास होऊ लागल्याने सईद यांना २४ डिसेंबर रोजी उपचारांसाठी 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली आणि आज सकाळी ८ वाजता त्यांवी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्यावर्षी काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर १ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 
सईद यांच्या निधनामुळे जम्मू-काश्मीरने एक राष्ट्रीय नेता गमावल्याची भावना व्यक्त होत असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. 
गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या तर २५ जागा जिंकत भारतीय जनता पक्ष दुस-या क्रमांकावर होता. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी युती करत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. वेगवेगळ्या भूमिका असलेले दोन्ही पक्ष एकत्र आल्याने त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान सईद यांच्या निधनानंतर त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे पीडीपी पक्षाची व जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. 

 
मुफ्ती यांचा जन्म १९३६ साली अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे झाला. त्यांनी श्रीनगरमधून कायद्याची पदवी घेतली तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून अरबांच्या इतिहासावर पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पन्नासच्या दशकात डेमॉक्रॅटिक नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य बनलेल्या मुफ्ती यांनी गुलाम मोहम्मद सादिक यांच्या नेतृत्वाखाली बराच काळ काम केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस रुजवली. राजीव गांधी यांच्या काळात ते देशाचे पर्यटनमंत्री बनले. 
१९८७ साली त्यांनी काँग्रेस सोडली आणि ते व्ही.पी.सिंग यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. सिंग यांचे सरकार सत्तेवर असताना मुफ्ती यांच्या रुपाने भारताला पहिला मुस्लिम गृहमंत्री मिळाला होता. व्ही. पी. सिंग सरकारमध्ये १९८९ ते ९० या काळात ते केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र त्यांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द वेगळ्याच कारणामुळे लक्षात राहिली. २ डिसेंबर १९८९ साली त्यांची तिसरी कन्या रूबैया हिचे अतिरेक्यांनी अपहरण केल्याने गदारोळ माजला. तिच्या सुटकेच्या बदल्यात पाच अतिरेक्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. व्ही.पी,सिंग सरकारने तडजोड करून मुफ्ती यांच्या मुलीची सुटका केली. 
नरसिंह राव यांच्या काळात मुफ्तींनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला, पण नंतर १९९९ साली त्यांनी मेहबूबा मुफ्ती या त्यांच्या कन्येसह 'पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी'ची स्थापना केली.  २००२ साली ते पहिल्यांदा जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १३ वर्षांनी पुन्हा २०१५ साली भाजपासोबत एकत्र येऊन त्यांनी काश्मीरमध्ये सरकार स्थापन करून दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 
 
मुफ्ती मोहम्मद सईद यांची राजकीय कारकीर्द
- मुफ्ती मोहम्मद सईद यांनी १९५० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. 
- १९७२ मध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री बनले.
- १९८७ साली त्यांनी काँग्रेसला रामराम केला
- १९८९ ते १९९० या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला
- २००२ साली ते पहिल्यांदा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
- तर १ मार्च २०१५ रोजी पीडीपी व  भाजपाची युती झाल्याने त्यांनी काश्मीरमध्ये सरकार स्थापन करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

Web Title: Jammu and Kashmir Chief Minister Mufti Mohammad Sayeed passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.