Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्यावेळेच्या घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:26 AM2022-10-04T05:26:15+5:302022-10-04T05:26:57+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून, याचवेळी पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीच एक मोठा घटना उघडकीस आली आहे. जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. हेमंत लोहिया यांचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे. दुसरीकडे, अमित शाह आपल्या तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी जम्मूत पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर लोहिया यांचा नोकर बेपत्ता झाला आहे. त्यामुळे लोहिया यांची हत्या नोकराने केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नोकराचा शोधही सुरू करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हेमंत लोहिया यांची हत्या का आणि कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ऑगस्ट महिन्यात झाली होती नियुक्ती
भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी हेमंत लोहिया यांची दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्टमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या तुरुंग विभागाचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लोहिया यांच्या घरात नुतनीकरणाचे काम सुरू होते आणि त्यामुळे ते जम्मूमध्ये त्यांचे मित्र राजीव खजुरिया यांच्या कुटुंबासोबत राहत होते. मित्राच्या घरी लोहिया यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडलेला आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासन सतर्क झाले आहेत. तसेच तीन दिवसीय दौऱ्यासाठी अमित शाह जम्मूत रात्री दाखल झाले. अमित शाह जम्मूत येत असतानाच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"