जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:12 PM2024-08-13T19:12:03+5:302024-08-13T19:12:40+5:30

Jammu and Kashmir Election 2024 : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Jammu and Kashmir Election 2024: Dates likely to be finalised soon, ECI-Home Secy meet to review J&K security situation ahead of polls: Sources | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. या आठवड्याच्या अखेरीस निवडणूक आयोग केंद्रीय गृह मंत्रालयासोबत बैठक घेणार आहे. 

या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी तारीख जाहीर करण्याचा अंतिम निर्णय घेईल. निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोगानं निवडणूक तयारीसाठी ८ ते १० ऑगस्टदरम्यान श्रीनगर आणि जम्मूचा दौरा केला आहे. 

दरम्यान, २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. १९ जून २०१८ रोजी भाजपनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. नंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 

यानंतर, ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारनं कलम ३७० आणि ३५ अ हटवलं होतं. तसंच, जम्मू आणि काश्मीर राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून उपराज्यपाल यांच्याकडे राज्यकारभाराची जबाबदारी आहे.

निवडणूक आयोगाच्या मते, उत्तर काश्मीरच्या जिल्ह्यांमध्ये अनेक आव्हाने आहेत. येथील अनेक भाग संवेदनशील मानले जातात. उत्तर काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला, बडगाम, बांदीपोर, गंदरबल, कुपवाडा, कुलगाम, पुलवामा, शोपियाँ आणि श्रीनगर जिल्हे संवेदनशील मानले जातात. तर जम्मूमध्ये कठुआ, सांबा, रियासी, जम्मू, उधमपूर हे जिल्हे संवेदनशील मानले जातात.

विधानसभा निवडणूक लढवणार - फारुख अब्दुल्ला 
जम्मू-काश्मीरमध्ये आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे सांगण्यास फारुख अब्दुल्ला यांनी नकार दिला. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केली.

Web Title: Jammu and Kashmir Election 2024: Dates likely to be finalised soon, ECI-Home Secy meet to review J&K security situation ahead of polls: Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.