१० वर्षांनंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक; तीन टप्प्यांत मतदान, हरयाणात एकच टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:33 AM2024-08-17T07:33:22+5:302024-08-17T07:33:56+5:30
४ ऑक्टोबरला निकाल, आयोगाची घोषणा
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ९० जागांसाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच हरयाणामध्ये ९० जागांसाठी येत्या १ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील. ही घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम २०१९ साली केंद्र सरकारने रद्द केले. त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात सरकार निवडण्यासाठी प्रथमच निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले की, यंदा व पुढील वर्षाच्या प्रारंभी आणखी काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरचा विषय २०१९-२० या कालावधीत उपस्थित झाला नव्हता. पण आता चित्र बदलले आहे. त्यामुळे दोन-दोन राज्यांत एकत्र विधानसभा निवडणुका घेण्याचे धोरण निवडणूक आयोगाने अवलंबिले आहे.
जम्मू-काश्मिरात असा आहे निवडणूक प्रवास
- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना २००२ साली सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये चार टप्प्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या.
- तिथे २००८मध्ये नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत सात टप्प्यांत तसेच २०१४मध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. जम्मू-काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे.
महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली यांचे वेळापत्रक कधी?
महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली येथील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जम्मू-काश्मीर, हरयाणातील विधानसभा निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हणजे ४ ऑक्टोबरनंतर निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये याआधीची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर २०१४मध्ये पाच टप्प्यांत पार पडली होती.
कोणत्या राज्यात कुणाचा प्रवास खडतर?
हरयाणामध्ये प्रस्थापितविरोधी जनमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपसाठी त्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा प्रवास खडतर ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या राज्यात भाजपने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून तिथे नायबसिंह सैनी यांना विराजमान केले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकांत जम्मूमध्ये दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांत उत्तम यश मिळेल असा विश्वास वाटत आहे. खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या होत्या. पाचव्या जागेवर अपक्ष उमेदवार अब्दुल रशीद शेख यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला होता.