जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 01:53 PM2024-11-02T13:53:17+5:302024-11-02T14:01:02+5:30
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
Anantnag Encounter :जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शांगस-लार्नू भागातील हलकन गलीजवळ ही चकमक झाली. सुरक्षा दलांसोबत झालेल्या या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी एक स्थानिक तर दुसरा बाहेरच्या देशाचा नागरिक आहे. तो कोणत्या दहशतवादी गटाचा सदस्य होता हे अद्याप समजू शकलेले नाही.
अनंतनागच्या हलकन गली भागात अजूनही चकमक सुरू आहे. परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अनंतनागशिवाय श्रीनगर आणि बडगाममध्येही चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सातत्याने कारवाया सुरू आहेत. दहशतवादी दररोज येथे घुसखोरी करण्याचा आणि नेहमीच दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत असतात. त्यामुळे सामना करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाया सुरु केल्या आहेत.
श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. खानयार परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त पथक संशयास्पद भागात पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. अशा प्रकारे ही चकमक सुरू झाली. परिसरात अजूनही गोळीबार सुरू आहे.
Two militants killed in encounter in Jammu and Kashmir's Anantnag: Police pic.twitter.com/PmharJ6Y1I
— Press Trust of India (@PTI_News) November 2, 2024
श्रीनगरशिवाय जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्येही चकमक सुरू आहे. शुक्रवारी बडगामच्या मागमच्या माझमा भागात दहशतवाद्यांनी दोन मजुरांना गोळ्या घातल्या होत्या. गोळीबारात बाहेरील दोन्ही मजूर जखमी झाले आहेत. हे कामगार जलजीवन प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उस्मान आणि संजय अशी या मजुरांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.