'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 14:15 IST2024-04-28T14:13:55+5:302024-04-28T14:15:09+5:30
Jammu and Kashmir Firing : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबाराच्या घटना घडत आहे. शनिवारी अज्ञातांनी एका मिठाईच्या दुकानावर गोळीबर केल्याचा प्रकार समोर आला.

'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
Jammu and Kashmir : जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा एकदा हिंचाराच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे परत भारतातील सर्वात सुंदर शहर अत्यंत संवेदनशील आणि अस्थिर क्षेत्र बनत आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील मीरान साहिब भागात एका मिठाईच्या दुकानावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर एका व्यक्तीने याची जबाबदारी घेत इशारा दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील मीरान साहिब भागात शनिवारी संध्याकाळी एका मिठाईच्या दुकानावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी काही अज्ञातांनी मिठाईच्या दुकानाजवळ पोहोचताच गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोराने तिथून पळ काढला. गोळीबाराच्या घटनेनंतर जम्मू पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एका मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मिठाईच्या दुकानावर गोळीबार करून पळ काढला.या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांची शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी मीरान साहिब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे गोळीबाराच्या घटनेनंतर अब्बू जट नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. "आज जे काही झाले, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. मीरा साहिब खजुरिया येथील मिठाईच्या दुकानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. आमच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही तर ते आणखी वाईट होऊ शकते. आम्ही इथे आहोत पण आमचे भाऊ अजूनही तिथेच आहेत. त्यामुळे चूक करू नका आणि ती स्वीकारा. आम्ही नवीन वळण घेतले असून शांततेसाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढची गोळी हवेत झाडली जाणार नाह," असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
#WATCH | J&K: Suspected criminals open fire at a sweet shop in the Miran Sahib area of Jammu. (27.03) pic.twitter.com/xa3N0BacZ1
— ANI (@ANI) April 28, 2024
दरम्यान, १७ एप्रिल रोजी संध्याकाळी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी एकावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बिहारमधील रहिवासी शंकर शाह यांचा मृत्यू झाला. त्याआधी ८ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील पदपवन येथे दहशतवाद्यांनी परमजीत सिंग यांना गोळ्या घातल्या. ते दिल्लीचे रहिवासी होते.